श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिराची चारही द्वारे खुली करण्याच्या आंदोलनास समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

भाविकांना विनाअडचणी देवाचे दर्शन मिळण्यासाठी आंदोलन करावे लागणे दुर्दैवी ! – संपादक 

आंदोलनास पाठिंब्याचे पत्र देतांना डावीकडून  श्री. रामभाऊ मेथे,  आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे,  श्री. किरण दुसे, सरपंच सौ. राधा बुणे,  श्री. शशी बीडकर,  श्री. राहुल चव्हाण,  श्री. शिवानंद स्वामी आणि  अधिवक्ता अमोल रणसिंग

जोतिबा (जिल्हा कोल्हापूर), १२ मार्च (वार्ता.) – लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे ११ मार्चपासून धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्व हक्कदार पुजारी, गुरव समाज, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. १२ मार्च या दिवशी या आंदोलनास कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला, तसेच पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. हे पाठिंब्याचे पत्र जोतिबा ग्रामपंचायत सरपंच सौ. राधा बुणे यांनी स्वीकारले.

या वेळी शिवसेनेचे कोल्हापूर उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, अधिवक्ता अमोल रणसिंग, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी, सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, जोतिबा देवस्थान येथील श्री. रणजित चौगुले, श्री. गणेश उपाध्ये, आचार्य श्री. प्रकाश सांगळे, सर्वश्री सागर फुकटी, अक्षय शिंगे, अखिल भोरे, विजय बुणे, पंकज सांगळे, शिवदत्त ठाकरे, समस्त १० गावकर (भावकीचे प्रमुख), पुजारी, शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर म्हणाले, ‘‘जोतिबा देवस्थान यांसह कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘ई-पास’ बंद होणे आवश्यक आहे.’’ हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे म्हणाले, ‘‘जोतिबा देवस्थान येथे चारपैकी तीन दरवाजे बंद असल्याने भक्तांवर अन्याय होत आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत, तरी शासनाने लवकरात लवकर ‘ई-पास’ रहित करून चारही दरवाजे खुले करावेत.’’

आंदोलनस्थळी उपस्थित असणारे भाविक

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून आंदोलनाची घटना राज्यभर पोचली ! – श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

या वेळी श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘या संदर्भात आंदोलन चालू होण्याच्या अगोदरपासूनच या संदर्भातील वार्तांकन दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये करण्यात येत आहे. या माध्यमातून आंदोलनची घटना राज्यभर पोचवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून होत आहे.’’

मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामुळेच प्रशासनाकडून जाचक अटी ! – श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

आता चालू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून भाविक, भक्त संघटित आहेत, हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर गेला आहे. महाराष्ट्रात अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले असून ३ सहस्र ६७ मंदिरे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कह्यात आहेत. मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामामुळेच प्रशासनाकडून जाचक अटी लादल्या जात आहेत. या अगोदरच्या काळात हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद यांनी व्यापक आंदोलनाद्वारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा घोटाळा उघडकीस आणला असून त्याची राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने चौकशी चालू आहे.

आंदोलनास यश येण्यासाठी सर्वांनी श्री जोतिबा देवाची भक्ती वाढवूया ! – आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे

या वेळी आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे म्हणाले, ‘‘कोरोना संसर्गाच्या पहिल्या-दुसर्‍या लाटेतही मंदिरे अनेक काळ बंद होती. यामुळे भाविकांना दीर्घकाळ देवाच्या दर्शनापासून वंचित रहावे लागले. आता सर्व खुले होत असतांना केवळ मंदिरामध्ये प्रवेश करतांना ‘ई-पास’ची सक्ती का ? या आंदोलनास यश येण्यासाठी आपण सर्व भाविकांनी श्री जोतिबा देवाची भक्ती वाढवूया.’’

दिवसभरातील अन्य घडामोडी

१. आंदोलनास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. मुरलीधर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार श्री. राजू शेट्टी यांसह विविध पक्ष, संघटना यांनी भेटून, पत्र देऊन पाठिंबा व्यक्त केला.

२. जोपर्यंत ‘ई-पास’ची सक्ती रहित होत नाही आणि चारही द्वारे खुली केली जात नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवून दुकाने बंद ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

क्षणचित्रे

१. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे.

२. जोतिबा देवाच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविकही आंदोलनाची माहिती घेऊन आंदोलनास पाठिंबा देऊन जात होते.

या आंदोलनास पाठिंबा दिल्याविषयी जोतिबा देवाचे पुजारी श्री. रणजित चौगुले यांनी समाधान व्यक्त करून भविष्यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी पुढच्या कालावधीतही साहाय्य करण्याचे वचन दिले आहे. त्यासाठी सर्व गुरव समाज, ग्रामस्थ, व्यापारी, ग्रामपंचायत आणि १० गावकर यांच्या वतीने आभार व्यक्त केले.