आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आवश्यक असलेले साधन आणि ज्ञान यांचा संग्रह करण्यासह साधना आरंभ करायला हवी !
‘जेव्हा काहीतरी वाईट घडते अथवा मृत्यू जवळ येतो, तेव्हा आपल्याला देवाचे स्मरण होते. अशा वेळी लोक सामान्यतः ‘हे देवा’, असे म्हणतात. याउलट तुम्ही जागतिक महायुद्धापूर्वी देवाचे स्मरण केलेत आणि साधनेला आरंभ केलात, तर युद्ध चालू झाल्यावर देव तुमची आठवण ठेवील अन् तुमचे रक्षण करील. त्या वेळी ‘हे देवा’, असे म्हणण्याची वेळ येणार नाही. युद्धकाळात देवाने तुमचे रक्षण केल्यावर त्याचे केवळ आभार न मानता त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अधिकाअधिक लोकांनी साधना करणे आरंभ केल्यास विनाशकारी काळाची तीव्रता न्यून होण्यास साहाय्य होणेअसे असले, तरी या युद्धाचा कालावधी आणि तीव्रता यांत पालट होऊ शकतो. जगाची वाटचाल झपाट्याने विनाशकारी युद्धाच्या दिशेने होत आहे; मात्र त्याच वेळी पृथ्वीवरील उच्च आध्यात्मिक पातळीचे संत ‘मानवजातीचे रक्षण व्हावे आणि जागतिक महायुद्धाची तीव्रता न्यून व्हावी’, यासाठी अखंड प्रयत्न करत आहेत. जसजसे अधिकाधिक लोक साधनेला आरंभ करत आहेत, तसतसा ‘त्यांना साधना करायला अवधी मिळावा आणि त्यांच्या साधनेचा पाया पक्का व्हावा’, यासाठी हे उन्नत संत स्वतःच्या संकल्पाने या युद्धाचा कालावधी पुढे ढकलत आहेत. ‘या युद्धाचा कालावधी आणि तीव्रता कोणत्या शक्तींचे प्रयत्न अधिक आहेत ?’, यावर अवलंबून आहे. जर वाईट शक्ती अधिक प्रयत्नशील असतील, तर युद्धाची तीव्रता अधिक असेल; याउलट अधिकाअधिक लोकांनी साधना करणे आरंभ केल्यास या विनाशकारी काळाची तीव्रता न्यून होईल. ‘तिसर्या जागतिक महायुद्धाचा कालावधी साधकांच्या ईश्वरभक्तीवर अवलंबून असेल. हे युद्ध भक्त (धर्माचरण करणारे जीव) आणि वाईट शक्ती (अधर्माचरण करणारे जीव) यांच्यात होणार आहे, त्यामुळे युद्धाचा कालावधी पालटू शकतो. साधनेमुळे अखिल मानवजातीच्या प्रारब्धात सकारात्मक पालट होऊ शकतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
६ मार्च २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात तिसर्या जागतिक महायुद्धाविषयी करण्यात आलेले भविष्यकथन आणि सूक्ष्मातील युद्ध याविषयीची सूत्रे आपण पाहिली होती. आज त्या पुढचा भाग येथे पाहूया. (उत्तरार्ध)
५. तिसर्या जागतिक महायुद्धाचे होणारे दुष्परिणाम
अ. ‘तिसर्या जागतिक महायुद्धानंतर झालेल्या प्रचंड हानीला तोंड देण्यासाठी आवश्यक आपत्कालीन साहाय्य यंत्रणा आणि शासकीय साहाय्य उपलब्ध होणार नाही अथवा या हानीला सामोरे जाण्याची त्यांची क्षमता नसेल.
आ. जगातील बहुतांश प्रमुख शहरे उद्ध्वस्त होतील आणि जगातील ७० टक्के संपर्कयंत्रणा नष्ट होतील.
इ. आधुनिक वैद्य आणि रुग्णालये अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असतील अन् औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण होईल.
ई. किरणोत्सर्गी अवपातामुळे मानव, प्राणी, जलचर आणि भूमी दूषित होतील. किरणोत्सर्गी अवपात म्हणजे अणूबाँबच्या स्फोटानंतर किरणोत्सर्गी कण किंवा किरण बाहेर टाकणार्या धुळीचा वर्षाव आणि फैलाव.
उ. किरणोत्सर्गी अवपातामुळे जवळजवळ वर्षभर पाणी दूषित राहील.
ऊ. या युद्धानंतर पुढील १० वर्षे धान्याचा तुटवडा भासेल आणि तीव्र इंधन टंचाई निर्माण होईल. त्यामुळे इंधनावर आधारित सर्व वाहतूकयंत्रणा बंद पडतील. या कालावधीत विद्युत्पुरवठा अत्यल्प प्रमाणात असेल.
ए. लोकांना नैराश्य, अतीचिंता आणि दुःख यांसारख्या मानसिक आजारांना सामोरे जावे लागेल.
ऐ. युद्धानंतर कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे कोलमडून जाईल. त्यामुळे मनुष्यातील वाईट प्रवृत्ती डोके वर काढतील; परिणामस्वरूप लूटमार आणि गुन्हेगारी वाढेल. प्रत्येक दिवशी जिवंत रहाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या कठीण काळात मनुष्याच्या खर्या स्वभावाची ओळख पटेल.
ओ. या युद्धाचा परिणाम ३० वर्षे टिकेल आणि जगाची पुनर्बांधणी करण्यासाठी १०० वर्षांचा कालावधी लागेल. हा कालावधी तुलनेने अल्प असला तरी पुरेसा आहे; कारण या युद्धात जगातील ५० टक्के लोकसंख्या नष्ट होणार आहे. त्यामुळे उर्वरित लोकांना जिवंत रहाण्यासाठी आवश्यक धनधान्य आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देता येईल.
युद्धानंतरचा हा काळ संपूर्ण जगाचे रहाणीमान पालटून टाकणारा असेल. तिसर्या जागतिक महायुद्धानंतर जे लोक वाचतील, त्यांना अत्यंत प्रतिकूल आणि गोंधळाच्या स्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे हा काळ मानवी सहनशक्ती आणि इच्छाशक्ती यांची कसोटी पहाणारा ठरेल. ‘स्वावलंबी बनणे’, हा या युद्धात वाचलेल्या लोकांसाठी मूलमंत्र असेल. त्यामुळेच कोलमडणार्या सामाजिक व्यवस्थांवर अवलंबून न रहाता जिवंत रहाण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये शिकून घेणे महत्त्वाचे आहे. ‘आवश्यक असलेल्या साधनसामुग्रीचा साठा करणे, या काळात उद्भवणार्या विविध संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवणे, तसेच किरणोत्सर्गी अवपाताच्या दूरगामी परिणामांना तोंड देण्यासाठी सिद्धता करणे’, यांचा आरंभ केल्यास युद्धोत्तर काळाला चांगल्या पद्धतीने सामोरे जाता येईल. आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक साधन आणि ज्ञान यांचा योग्य प्रकारे संग्रह करणे, हे जीवनदायी, तसेच आपत्काळात टिकून रहाण्यासाठीची सिद्धता वाढवणारे ठरेल.
६. तिसर्या जागतिक महायुद्धातील भारताची भूमिका
प्राचीन काळापासून भारताने संपूर्ण विश्वाचे आध्यात्मिक नेतृत्व केलेले आहे. आध्यात्मिक संशोधनातून हे दिसून आले आहे की, या महायुद्धात आध्यात्मिक दृष्टीने भारत केंद्रस्थानी असणार आहे. ‘संपूर्ण विश्वाची सात्त्विकता वाढून तिसर्या महायुद्धाची भीषणता न्यून व्हावी’, या दृष्टीने भारतातील उच्च आध्यात्मिक पातळी असलेले संत सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या महायुद्धातील भारताचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेता त्याला अस्थिर करण्याच्या दृष्टीने वाईट शक्ती शेजारील देशांना भारतावर आक्रमण करण्यास भाग पाडतील. त्यामुळे या युद्धात भारताची साधारण ५० टक्के लोकसंख्या नष्ट होईल.
७. हे युद्ध टाळता येऊ शकेल का ?
या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर ‘नाही’, असेच आहे; मात्र ‘युद्धाची तीव्रता आणि कालावधी, तसेच नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण’, यांत काही पालट होऊ शकतात. ही विनाशकारी घटना अटळ असण्यामागे असलेले कारण जाणून घेऊया.
मागील काही दशकांत पृथ्वीवरील रज-तमाचे आधिक्य वाढल्याने पृथ्वीची सात्त्विकता झपाट्याने न्यून होत आहे. याला ‘लोकांमध्ये वाढलेले स्वभावदोष, समाजाचा मायेकडे असणारा प्रचंड ओढा, साधनेचा अभाव, तसेच सप्तपाताळांतील वाईट शक्तींच्या प्रभावामुळे लोकांमध्ये मनाप्रमाणे वागण्याचे वाढलेले प्रमाण’ इत्यादी घटक कारणीभूत आहेत. जेव्हा पृथ्वीवर रज-तमाच्या अधिक्यामुळे सात्त्विकता उणावते, तेव्हा समाज आणि वातावरण यांत अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे नैसर्गिक त्ती, आतंकवादी कारवाया आणि युद्धे यांसारख्या विनाशकारी घटना घडतात. या घटना म्हणजे रज-तमाचे अधिक्य असलेल्या लोकांना नष्ट करण्यासाठी घडून आलेली स्वयंचलित स्वच्छता प्रक्रिया आहे.
या घटना थांबवण्यासाठी पृथ्वीवरील रज-तमाचे प्रमाण न्यून करून पृथ्वीची सात्त्विकता वाढवणे आवश्यक आहे. हे घडून येण्यासाठी अखिल मानवजातीने तिच्या सध्याच्या राहणीमानात आमूलाग्र पालट करणे, तसेच साधनेच्या ६ मूलभूत तत्त्वांनुसार (टीप) साधना करणे अत्यावश्यक आहे. ६ मूलभूत तत्त्वांनुसार साधना केल्यासच आध्यात्मिक प्रगती होऊ शकते.
(टीप – अनेकातून एकात जाणे, स्थुलातून सूक्ष्मात जाणे, पातळीनुसार साधना, वर्णानुसार साधना, आश्रमानुसार साधना आणि काळानुसार साधना.)
जे पंथ वा संप्रदाय ‘स्वतःचा साधनामार्ग हा ईश्वरप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे’, असा प्रसार करतात, तसेच समाजातील लोकांना सक्तीने अथवा लाच दाखवून त्यांचे धर्मांतर करतात, ते सर्व जण साधनेच्या मूलभत तत्त्वांचे पालन करत नाहीत. त्यामुळे अशा पंथांतील लोकांचे साधनेचे प्रयत्न मर्यादित रहातात. काही पंथ उघडपणे सामाजिक हिंसाचाराची शिकवण देतात आणि जे लोक या शिकवणीचे पालन करतात, त्या लोकांची आध्यात्मिक अधोगती होते आणि ते स्वतःसाठी तीव्र प्रारब्ध निर्माण करतात. समाजाच्या रहाणीमानात आमूलाग्र पालट होण्याची शक्यता शून्य टक्के असल्याने हा विनाश घडून येणे अपरिहार्य आहे.
८. साधना केल्यामुळे ५० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले अथवा साधना करून आध्यात्मिक प्रगती करू शकणारे जीवच या महायुद्धात वाचतील.
९. सूक्ष्मातून युद्ध करणार्या चांगल्या शक्ती कोणत्या आहेत ?
सूक्ष्मातील युद्ध वर्ष १९९९ ते वर्ष २०२४ या कालावधीत लढले जाईल. चांगल्या आणि वाईट शक्तींमधील या युद्धात चांगल्या शक्तींचे नेतृत्व पृथ्वीवर वास करणारे ९० टक्के आणि त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले संत (परात्पर गुरु) करत आहेत. आरंभी केवळ परात्पर गुरु आणि काही साधक हे सूक्ष्मातील युद्ध लढत होते. काळानुसार अधिकाधिक संत आणि साधक या सूक्ष्मातील युद्धात सहभागी होत आहेत. सप्तलोकांतील आध्यात्मिक दृष्टीने उन्नत जीवही या युद्धात सहभागी होत आहेत.
१०. तात्पर्य
सध्या आपण युगपरिवर्तनाच्या कालावधीतून जात आहोत. हा लेख समाजात भीती निर्माण करण्यासाठी नव्हे, तर समाजाला जागरूक आणि सावध करण्यासाठी प्रकाशित करत आहोत. साधनेची आवड असलेले जीव आणि साधक यांनी या लेखाचा अभ्यास करून स्वतःची साधना बळकट होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. सध्याचा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत पूरक आहे. कठोर साधना केल्यास साधकांना महायुद्धाची तीव्रता न्यून करण्याचे आणि स्वतःचे रक्षण करण्याचे बळ प्राप्त होईल. एका देशातून दुसर्या देशात जाण्यासाठी ‘व्हिसा (प्रवेश परवान्यावर अनुमतीचा शिक्का)’ लागतो, त्याचप्रमाणे ‘कठोर साधना करून आध्यात्मिक प्रगती करणे’, हा ईश्वरी राज्यात रहाण्याचा ‘व्हिसा’ आहे. जो जीव तळमळीने साधना करून साधक बनण्याचा प्रयत्न करील, त्याचे रक्षण ईश्वर निश्चितच करणार आहे.
या युद्धाचे स्वरूप ‘एका देशाने दुसर्या देशाचा युद्धात पराभव केला आणि स्वतःच्या जीवनमानाचे रक्षण केले’, असे नाही. हे युद्ध ‘स्वातंत्र्य, लोकशाही अथवा एक विशिष्ट शासनप्रणाली’, यांसाठीही नाही. हे युद्ध ‘चांगली शक्ती आणि वाईट शक्ती’, तसेच ‘सात्त्विकता आणि असात्त्विकता’ यांमधील आहे. या युद्धाचे स्वरूप आध्यात्मिक आहे आणि जगाची आध्यात्मिक शुद्धी करण्याच्या दृष्टीने ते लढले जात आहे. या युद्धात सात्त्विकतेचे प्रमाण अधिक असणार्या सर्व जिवांचे रक्षण होणारच आहे.’
– श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), संपादक, एस्.एस्.आर्.एफ्. आणि संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (वर्ष २०१६) (समाप्त)
(हा लेख http://ssrf.org/ww3 या लिंकवर उपलब्ध आहे.)