मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – इतर मागासवर्गीय समाजाची सर्र्वंकष माहिती गोळा करण्याचे दायित्व यापूर्वी मागासवर्ग आयोगाकडे देण्यात आले होते; मात्र माहिती गोळा करण्यास होत असलेल्या विलंबामुळे त्यासाठी सरकारने ५ जणांची समिती नेमली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १० मार्च या दिवशी ही माहिती विधान परिषदेत दिली. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने हा तारांकित प्रश्न सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राखून ठेवला आहे.
या समितीमध्ये जयंत बांटिया, महेश झगडे, हमीद पटेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या शालिनी भगत आणखी अन्य एक यांचा समावेश आहे. या समितीला माहिती गोळा करण्याविषयी सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे इतर मागासवर्गीय समाजाची सर्र्वंकष माहिती गोळा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले.
राज्य शासनाने सचिव देशमुख यांच्याकडे माहिती दिली होती; मात्र देशमुख यांनी आयोगाला चुकीची माहिती दिली. देशमुख यांच्या चौकशीत त्यांनी चूक स्वीकारली आहे. चुकीची माहिती देऊन त्यांनी मागासवर्गीय आयोगाचीही फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली.