राज्यातील वीज आस्थापनांचे खासगीकरण होणार नाही ! – प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्यमंत्री

मुंबई – राज्यातील १६ शहरांतील वीज आस्थापनांचे खासगीकरण करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ९ मार्च या दिवशी विद्युत् विभागाच्या कर्मचार्‍यांना आझाद मैदान येथे दिले. केंद्राच्या वीज विधेयक २०२१ आणि राज्यातील विविध शहरांतील वीज आस्थापनांचे खासगीकरण यांच्या विरोधात कामगार, अधिकारी आणि अभियंता यांच्या २६ संघटनांनी आझाद मैदानामध्ये एकदिवसीय आंदोलन केले. या वेळी प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलकांना वरील आश्वासन दिले.

या वेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की, राज्यातील हायड्रो प्रकल्प जलसंपदा विभागाशी निगडित आहेत. हे सर्व प्रकल्प महानिर्मितीकडे हस्तांतरित करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. न्यायालायाच्या निर्णयाच्या अधीन राहून ३ सहस्रांहून अधिक विद्युत् साहाय्यक कर्मचार्‍यांची भरती केली आहे. महापारेषण आणि महावितरण यांमध्येही कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे.

कृषी वीज देयकाविषयी पीक पद्धतीवर आधारित विजदेयक देणे, क्रॉस अनुदान वितरण वेगळ्या पद्धतीने करणे याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याची चाचपणी चालू आहे, असे तनपुरे यांनी सांगितले.