अमेरिकेत शिखांच्या विरोधात भेदभाव वाढला  ! – मानवाधिकार तज्ञांचा दावा

भारताने अमेरिकेतील शिखांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे ! – संपादक

वॉशिंगटन – अमेरिकेतील शीख समुदायाच्या विरोधात धार्मिक भेदभाव आणि द्वेषपूर्ण गुन्हे यांमध्ये अलीकडच्या वर्षांत वाढ झाली आहे, असा दावा प्रसिद्ध मानवाधिकार तज्ञ श्रीमती अमृतकौर आकरे यांनी नुकताच येथे केला. त्यांनी प्रशासन आणि अमेरिकन काँग्रेस यांना हा भेदभाव संपवण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे.

काँग्रेसच्या ‘मानवाधिकारांचे हनन’ याविषयावर झालेल्या चर्चेच्या वेळी आकरे यांनी सदस्यांना ही माहिती दिली. आकरे या ‘शीख कोएलिशन’ या संघटनेच्या कायदेशीर प्रकरणांच्या संचालक आहेत. या वेळी खासदार शीला जॅक्सन म्हणाल्या, ‘‘अमेरिकेत पगडी घालणार्‍या शीख मुलांना  ‘आतंकवादी’ म्हटले जाते आणि शीख मुलींचे केस  लांब असल्याने त्यांचा छळ केला जातो. अशी अनेक शीख मुले हिंसाचारालाही बळी पडतात. आमच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ५० टक्क्यांहून अधिक शीख मुलांना शाळेत इतर विद्यार्थ्यांकडून छळाचा सामना करावा लागला आहे. खासदार प्रमिला जयपाल यांनीही याचा निषेध केला आहे.