कथावाचक मोरारी बापू अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी विदेशातून मिळालेल्या धनाचा वापर युक्रेनमधील युद्धग्रस्तांसाठी करणार !

मानवतेच्या दृष्टीने कुणी कुणाला साहाय्य करत असेल, तर ते योग्यच आहे; मात्र हिंदूंनी मंदिरासाठी अर्पण केलेले धन मंदिरासाठीच खर्च करणे आवश्यक आहे. जर ते अन्य कार्यासाठी खर्च करायचे असेल, तर हे धन अर्पण केलेल्या हिंदूंची अनुमती घेणे आवश्यक आहे, अन्यथा ती फसवणूक होऊ शकते ! – संपादक

कथावाचक मोरारी बापू

नवी देहली – कथावाचक मोरारी बापू यांनी अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी केलेल्या आवाहनामुळे त्यांच्या न्यासाने १९ कोटी रुपये देशविदेशातून गोळा केले. यांपैकी ९ कोटी रुपये विदेशातून मिळाले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे ही रक्कम भारतात हस्तांतरित झालेली नाही. याच ९ कोटी रुपयांमधून मोरारी बापू यांनी १ कोटी २५ लाख रुपये युक्रेनमधील युद्धग्रस्त लोकांना दान देण्याचे घोषित केले आहे. पुण्याजवळील लोणावळा येथे रामकथा सांगण्याच्या वेळी त्यांनी ही घोषणा केली. युक्रेनमधील युद्धग्रस्त लोकांना बाहेर काढण्यासाठी शेजारील पोलंड, स्लोव्हाकिया आणि रोमानिया देशांमध्ये कार्यरत विविध संघटनांना ही रक्कम देण्यात येणार आहे.