रशियाशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सहभागी झाला भारतीय तरुण !

सैनिकेश रविचंद्रन् (उजवीकडे)

कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला १३ दिवस झाले आहेत. या युद्धात युक्रेनला साहाय्य करण्यासाठी विदेशातूनही तरुण येत आहेत. यात भारताच्याही एका तरुणाचा समावेश आहे, अशी माहिती ‘द कीव इंडीपेंडन्ट’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

सैनिकेश रविचंद्रन् असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा तमिळनाडूतील कोइंबतूर येथील रहिवासी आहे. शिक्षणाच्या निमित्ताने तो युक्रेनमध्ये गेला आहे. तो २१ वर्षांचा आहे. सैनिकेश याने यापूर्वी भारतीय सेनेत सहभागी होण्याचेही प्रयत्न केले होते; मात्र त्यात त्याला यश मिळाले नव्हते.

युद्धामुळे सैनिकेश याचा त्याच्या भारतातील कुटुंबियांशी संपर्क तुटला होता. याविषयी कुटुंबियांनी भारतीय दूतावासाकडे साहाय्य मागितले होते. त्यानंतर संपर्क होऊ शकलेल्या सैनिकेशने आई-वडिलांना तो युक्रेन सैन्यात सहभागी झाल्याची माहिती दिली. भारतीय अधिकार्‍यांनी सैनिकेशच्या आई-वडिलांशी संपर्क साधल्यानंतर ही गोष्ट समोर आली.

युक्रेन सैन्याने स्थापन केले ‘आंतरराष्ट्रीय सैन्यदल !’

रशियाविरुद्ध चालू असलेल्या युद्धाच्या काळात युक्रेनने ‘आंतरराष्ट्रीय सैन्यदल’ या नव्या पथकाची स्थापना केली. यामध्ये मेक्सिको, अमेरिका, ब्रिटन, स्विडन, लिथुआनिया आणि अन्य देशांतील तरुण या युद्धात युक्रेनच्या बाजूने सहभागी झाले आहेत. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहस्रो परदेशी नागरिकांनीही युक्रेन सैन्याकडे अर्ज करत युद्धात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.