|
|
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
जळगाव, ७ मार्च (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर डोक्यावर तुळस घेतलेली महिला आणि तुळशीच्या कुंडीवर स्वस्तिक चिन्ह असल्याचे चित्र रेखाटले आहे. समवेत चिपळ्या आणि विणा घेतलेले वारकरी यांचेही चित्र आहे. हे चित्र ‘स्वच्छ भारत अभियान २०२२’च्या अंतर्गत रंगवण्यात आले आहे. (हे आहेत हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचे दुष्परिणाम ! – संपादक) या चित्राद्वारे समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या असून या प्रकरणी पालिका मुख्याधिकार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी सावदा पोलीस ठाण्यात दिले. नगरपालिका हद्दीतील पाताळगंगा या नैसर्गिक नाल्याच्या काठावर महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दर्शनी भिंतीवर हे चित्र रंगवण्यात आले आहे. ‘हिंदु धर्मात तुळस आणि स्वस्तिक यांना पवित्र मानले असतांनाही ही प्रतिके आणि वारकरी यांच्या चित्राचा अशा प्रकारे का वापर केला ?’, असा स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,…
१. सप्टेंबर २०२१ मध्ये ‘माझी वसुंधरा’ या कार्यक्रमांतर्गत ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी अतिशय घाणेरड्या कुंडात मूर्ती विसर्जन करावे’, असे अधर्मी प्रसिद्धीपत्रक परिषद प्रशासनाने प्रसिद्ध केले होते. या कृत्याविषयी सावदा येथील नागरिक संतप्त झाले होते. याप्रसंगी शहर शिवसेनेच्या वतीने हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या; म्हणून मुख्याधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
२. सध्याची घटना पहाता लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा मुख्याधिकार्यांचा दुष्ट हेतू आहे, अशी जनभावना आहे. शहराची शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे दायित्व ज्या अधिकार्यांवर आहे, त्यांच्यासमोरच अशी कृत्ये वारंवार होत आहेत. तरी यास उत्तरदायी असलेले अधिकारी, ठेकेदार, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद व्हावा.
या निवेदनावर सर्वश्री धनंजय चौधरी, भरत नेहते, बाळू लोखंडे, गणेश बोराडे, निखिल लोखंडे, चेतन माळी, तसेच शेख इरफान शेख इक्बाल, हुसेन खान अयुब खान यांच्या स्वाक्षर्या आहेत.
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हिंदूंचे ठिय्या आंदोलन !
हिंदूंवर आंदोलन करण्याची वेळच का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक
सावदा नगरपरिषदेने सार्वजनिक शौचालयावर विडंबनात्मक धार्मिक चित्र रेखाटून हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे ७ मार्च या दिवशी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकार्यांच्या दालनासमोर हिंदूंनी ठिय्या आंदोलन केले. त्याची नगरपरिषद प्रशासनाने गंभीर नोंद घेत आरोग्य निरीक्षकांना या चित्राविषयी ३ दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याविषयी नोटीस बजावली आहे. आरोग्य निरीक्षकांच्या स्पष्टीकरणाकडे सावदावासियांचे लक्ष आहे.