जळगाव जिल्हा रुग्णालयासाठीची व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया रहित करण्याचे आदेश ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

  • आरोग्यमंत्र्यांनी खरेदी प्रक्रिया रहित करण्यासमवेत तांत्रिक निर्देशानुसार साहित्य पुरवठा न करणार्‍या आस्थापनावर आणि खरेदीस मान्यता देणार्‍या जिल्हास्तरीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक
  • जे एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला कळते, ते तेथील कर्मचार्‍यांना लक्षात येत नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! – संपादक

  • न्यून दर्जाचे व्हेंटिलेटर्स खरेदी झाले असते, तर तो जनतेच्या जिवाशीच खेळ झाला नसता का ? त्यामुळे याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक
आरोग्यमंत्री राजेश टोपे

जळगाव, ५ मार्च (वार्ता.) – जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणी चौकशी समितीकडून चौकशी करण्यात आली असून पुरवठादाराकडून पुरवण्यात आलेल्या साहित्यामध्ये (दर्जाच्या दृष्टीने) अनियमितता झाली असल्याने खरेदीचे कंत्राट रहित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत दिली. जिल्हा रुग्णालयासाठी ३० व्हेंटिलेटर्सच्या खरेदीत अपव्यवहार झाल्याविषयी तारांकीत प्रश्न ४ मार्च या दिवशी विधानपरिषदेच्या पटलावर चर्चेला ठेवण्यात आला होता. त्यावर टोपे यांनी लेखी उत्तर दिले आहे.

या व्हेंटिलेटर्सची किंमत अनुमाने पावणेदोन कोटींहून अधिक असून त्याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी माहिती मागवली होती. त्यात मागवलेले व्हेंटिलेटर्स आणि प्रत्यक्षात पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स यात दर्जाच्या दृष्टीने मोठी तफावत असल्याचे आढळून आल्याने भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ६ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून चौकशीअंती संपूर्ण खरेदी प्रक्रिया रहित करण्याचे लेखी आदेश जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिले होते.

या प्रकरणी ‘जिल्हाधिकार्‍यांनी केवळ खरेदी प्रक्रिया रहित करण्याचे आदेश देणे पुरेसे नसून दोषींवर कारवाई करावी अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू’, असे तक्रारदार भोळे यांचे म्हणणे होते.