सत्ताधारी आणि विरोधक यांनी घातलेल्या गोंधळामुळे अभिभाषण पूर्ण न करताच राज्यपालांनी केला सभात्याग !

गोंधळाचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप !

लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सभागृहातील असे वर्तन हे लोकशाहीचे दुर्दैव होय ! – संपादक

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – राज्यपालांच्या अभिभाषणाने विधीमंडळाच्या अर्थसंकल्पाला प्रारंभ होतो; मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधक यांनी सभागृहात घोषणा दिल्या. या वेळी सभागृहात झालेल्या गोंधळामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषण पूर्ण न करताच सभात्याग केला. यामुळे २ मिनिटांतच राज्यपालांच्या अभिभाषणाचा कार्यक्रम आटोपता  घेण्यात आला. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून झालेल्या प्रकाराचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

३ मार्चला, म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रारंभ होण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपिठावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना हाताने थांबण्याची खूण केली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घोषणा देण्याचे थांबवले; मात्र त्यानंतर विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास प्रारंभ केला. या वेळी विरोधकांनी हातात फलक घेऊन अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी केली. विरोधकांनी सभागृहात नवाब मलिक आणि महाविकास आघाडी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.