‘फोन टॅपिंग’प्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा ‘जबाब’ नोंदवणार !

रश्मी शुक्ला

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह विविध राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांचे ‘फोन टॅपिंग’ (अवैधपणे दूरभाषचे ध्वनीमुद्रण) केल्याप्रकरणी नोंद असलेल्या गुन्ह्यात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांचा पुणे पोलिसांकडून ‘जबाब’ नोंदवला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे जवळपास ६० दिवस ‘फोन टॅप’ केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.

पुणे पोलीस आयुक्त असतांना शुक्‍ला यांनी नेत्यांच्या ‘फोन टॅपिंग’साठी अनुमती घेतांना ग्राहक अर्ज आवेदन पत्र (सी.ए.एफ्.) गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना सादर करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात त्यांनी संबंधित पत्रच सादर केले नसल्याचेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये तत्कालीन अमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे. शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना या प्रकरणामध्ये साहाय्य करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांचीही चौकशी होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.