धुळे येथील युवतीने केला दोन टवाळखोरांचा प्रतिकार !

  • स्वरक्षण प्रशिक्षण काळाची आवश्यकता ! – संपादक

  • असा प्रसंग कोणत्याही युवतीवर ओढवू शकतो. त्यामुळे प्रत्येक युवतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे. या प्रसंगातून अन्य युवतींनीही बोध घ्यावा ! धैर्याने टवाळखोरांना चोप देणार्‍या युवतीचे हार्दिक अभिनंदन ! – संपादक

धुळे, १ मार्च (वार्ता.) – धुळे येथील एक युवती आणि तिची आई रस्त्याने नेहमीप्रमाणे कामाला जात असतांना दोन टवाळखोर तरुण सायकल चालवत त्यांच्याभोवती फेर्‍या मारत गाणे म्हणत होते. पहिल्या दिवशी तिच्या आईने याकडे दुर्लक्ष केले; मात्र दुसर्‍या दिवशी पुन्हा ते टवाळखोर त्या युवतीला छळण्याच्या प्रयत्नात होते. त्या वेळी तिच्या आईने त्यांची सायकल रोखली. ते दोघे खाली पडले. युवती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विनामूल्य चालवल्या जाणार्‍या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गा’ला नियमित जात हाती. त्यामुळे तिच्या मनात शौर्य जागृत झाले, आत्मविश्वास आला आणि स्वसंरक्षणार्थ तिनेही त्यांच्या कानशिलात लगावत त्या तरुणांना चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर ते दोघे तरुण तिथून निघून गेले.