विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये जाणार !

मोदी सरकारचा निर्णय

केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (मध्यभागी)

नवी देहली – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. तेथे हे मंत्री विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी समन्वय साधण्याचे काम करणार आहेत. या मोहीमेला ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारल या ४ मंत्र्यांमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह यांचा समावेश आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी २७ फेब्रुवारीलाही आपात्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीस परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला उपस्थित होते. यामध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विद्यार्थ्यांचे रक्षण आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढणे, हे आपले प्राधान्य आहे’, असे सांगितले.