‘युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्च’कडून रशियाच्या आक्रमणाला विरोध !

कीव (युक्रेन) – येथील ‘युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्च’ने रशियाच्या आक्रमणाला विरोध केला आहे. दुसरीकडे पुतिन हे ‘रशियन ऑर्थोडॉक्स चर्च’ला झेलेंस्की ज्यू असल्याचा संदर्भ देत आक्रमणाचे समर्थन करत आहेत. युक्रेन आणि रशिया हे दोघेही ‘रशियन ऑर्थोडॉक्स चर्च’चे अनुयायी आहेत; परंतु युक्रेनियन चर्चला सोव्हिएत काळातील कम्युनिस्ट सरकारांच्या दडपशाहीची आठवण आहे. त्या वेळी त्यांना धार्मिक स्वातंत्र्य नव्हते. आता रशियाच्या आक्रमणामुळे त्यांना भूतकाळाची आठवण होत आहे.

युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चने वर्ष २०१९ मध्ये रशियन ऑर्थोडॉक्स चर्चपासून विभक्त होऊन स्वतःला मुक्त केले होते. आता युक्रेनच्या चर्चला अमेरिकेसह इतर पाश्‍चात्त्य देशांकडून आर्थिक आणि इतर साहाय्य मिळते. हे रशियाला मान्य नाही.

रशियाचे ५ सहस्र ३०० सैनिक ठार ! – युक्रेनचा दावा

युक्रेनवर रशियाचे आक्रमण सहाव्या दिवशीही चालूच आहे. युक्रेनने दावा केला आहे की, या युद्धात आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र ३०० रशियन सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनच्या सैन्याने अनुमाने रशियाचे १५१ रणगाडे, २९ विमाने आणि २९ हेलिकॉप्टर्स नष्ट केले आहेत.

दुसरीकडे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने युक्रेनमध्ये ९४ लोकांचा मृत्यू,तर ३७६ नागरिक घायाळ झाल्याची माहिती दिली आहे.