माहिती अधिकारातील उत्तरावरून कराड नगरपालिकेच्या अधिकार्‍यास मारहाण

कराड, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील नगरपालिकेमध्ये एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. ती नगर रचनाकार अधिकार्‍याने अर्जदारास दिली; मात्र माहिती अशीच का दिली ? या कारणावरून चिडून त्या व्यक्तीने नगर रचनाकार यांना मारहाण केली. नंतर पालिका मुख्याधिकारी रमाकांत डोंगे यांनी घटनेची गंभीर नोंद घेत कराड शहर पोलीस ठाण्यासमोर सहकारी कर्मचारी यांच्यासमवेत ठिय्या मांडला. जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, असा पवित्रा घेतला. कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बी.आर्. पाटील यांनी संतप्त कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पाटील यांनी संबंधितावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू केली.