शासकीय निधीचा अपहार केल्याचे प्रकरण
अकोला – बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची नोंद घेऊन बच्चू कडू यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. राज्यपालांनी येथील पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके काय आहे प्रकरण ?
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. बच्चू कडू यांनी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करून घेत अपहार केला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता. याविषयाची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आली. संबंधित कागदपत्रे पडताळल्यानंतर राज्यपालांनी बच्चू कडू यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचेही नाव समोर आले आहे. इतर जिल्हा आणि ग्राम मार्ग हे शासन क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामांची सूची जिल्हा परिषदेला पाठवून बच्चू कडू यांनी सरकारी निधीचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याविषयाचे पुरावे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी समोर आणले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याविषयी राज्यपालांची भेट घेऊन योग्य कारवाईची मागणी केली होती.