रशियाच्या आक्रमणात जगातील सर्वांत मोठे मालवाहू विमान जळून खाक !

युक्रेनचे जगातील सर्वांत मोठे मालवाहू विमान ‘अँटोनोव्ह-२२५ म्रिया’ (संग्रहित छायाचित्र)

कीव (युक्रेन) – रशियाच्या आक्रमणात जगातील सर्वांत मोठे मालवाहू विमान जळून खाक झाले. युक्रेनचे ‘अँटोनोव्ह-२२५ म्रिया’ हे जगातील सर्वांत मोठे मालवाहू विमान आहे. हे विमान युक्रेनची राजधानी असलेल्या कीवजवळील होस्तोमील विमानतळावर उभे करण्यात आले होते. येथे रशियाने हवाई आक्रमण करून हे विमान नष्ट केले.
हे विमान अनुमाने ८४ मीटर लांब, तर १८ मीटर उंच होते. याच्या आतमध्ये  सामान ठेवण्यासाठी अनुमाने ४३ मीटर लांब, ६.४ मीटर रुंद आणि ४.४ मीटर उंच इतकी मोठी जागा होती. २५० टनाहून अधिक वजन वाहून नेण्याची या विमानाची क्षमता होती. या विमानाने सप्टेंबर २००१ मध्ये ४ रणगाडे घेऊन आकाशात उड्डाण केले होते. त्यांचे एकूण वजन तब्बल २५३ टन इतके होते. एखाद्या विमानाने सर्वाधिक वजन वाहून नेण्याचा हा आतापर्यंतचा जागतिक विक्रम आहे.