युक्रेनला शस्त्रखरेदीसाठी युरोपीयन महासंघ साहाय्य करणार !

युरोपीयन महासंघाच्या उर्सुला वॉन डर लेयन

कीव (युक्रेन) – युक्रेनला शस्त्रखरेदीसाठी साहाय्य करण्याची घोषणा युरोपीयन महासंघाने केली. शत्रूचे आक्रमण झेलणार्‍या कोणत्याही देशाला संयुक्त महासंघाने अशा प्रकारचे साहाय्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महासंघाच्या उर्सुला वॉन डर लेयन यांनी याविषयीच्या प्रसारित केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे, ‘‘आम्ही युक्रेनला आमचा पाठिंबा दर्शवत आहोत. प्रथमच युरोपीयन महासंघ आक्रमण झालेल्या एखाद्या देशाला शस्त्रखरेदी करण्यासाठी आणि ही शस्त्रे त्या देशात पोहचवण्यासाठी आर्थिक साहाय्य करणार आहे. यासह रशियावरील आर्थिक निर्बंध आणखीन कठोर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’

युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय महासंघाने निवडक रशियन बँकांची ‘स्विफ्ट’ या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हकालपट्टी केली आहे. यासह त्यांनी रशियाच्या मध्यवर्ती बँकेवरही निर्बंध आणले आहेत. या कठोर निर्बंधांमागे रशियाची अर्थक्षमता नियंत्रित करून रशियाचा युद्धासाठीचा अर्थपुरवठा खंडित करण्याचा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा हेतू आहे.