पुढील २४ घंटे अत्यंत महत्त्वाचे ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष

बेलारूसही रशियाच्या बाजूने युद्धात उतरणार !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – ‘पुढील २४ घंटे अत्यंत महत्त्वाचे आहेत’, असे विधान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेंस्की यांनी केले आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या सैन्याला गेल्या ४ दिवसांपासून राजधानी कीवच्या सीमेवर रोखून धरले आहे. अनेक प्रयत्नांनंतरही  रशियाच्या सैन्याला फार आतमध्ये शिरता आलेले नाही. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन संतापले आहेत. यातूनच त्यांनी अण्वस्त्रे सिद्ध ठेवण्याची घोषणा केली आहे. यामुळे अण्वस्त्राद्वारे आक्रमण होण्याच्या शक्यतेने संयुक्त राष्ट्रांनी आपत्कालीन बैठक बोलावली.

१. रशियाच्या सैन्याला कीव जिंकता येत नसल्याचे पाहून रशियाचा मित्र बेलारूसही  आता या युद्धात उतरणार आहे. युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे. या दोन्ही देशांनी युद्धाआधी मोठा सराव केला होता. यामुळे युक्रेनला आता दोन देशांच्या सैन्यांशी लढावे लागणार आहे.

२. युक्रेनने जारी केलेल्या निवेदनानुसार, गेल्या ४ दिवसांत रशियाच्या आक्रमणामध्ये ३५२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात १४ मुलांचाही समावेश आहे.

कीव (युक्रेन) येथील भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियाच्या सीमेवर घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वे सेवा

कीव (युक्रेन) – येथील संचारबंदी मागे घेण्यात आल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना देशातून बाहेर काढण्यासाठी विशेष रेल्वे सेवा चालू करण्यात आली आहे. या रेल्वेतून भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियाच्या सीमेवर घेऊन जाण्यात येणार आहे. त्यानंतर रोमानियातून विशेष विमानाद्वारे या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात येणार आहे. सध्या या विद्यार्थ्यांनी छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.