युद्ध आणखी १० दिवसांपेक्षा अधिक चालले, तर रशिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचेल ! – संरक्षण तज्ञांचा दावा

युद्धावर प्रतिदिन व्यय (खर्च) होत आहेत १ लाख १२ सहस्र कोटी रुपये !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनवर आक्रमण करून ५ दिवस झाले आहेत; मात्र अद्याप रशिया युक्रेनचा पाडाव करू शकलेला नाही. ‘युक्रेनवर लवकर नियंत्रण मिळवता येईल’ असा रशियाचा समज होता; परंतु तो चुकीचा ठरला. आता जर हे युद्ध आणखी १० दिवस चालले, तर रशिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचेल. पुतिन यांना वाटाघाटी करण्यास भाग पडावे लागेल, असा दावा एस्टोनिया या युरोपमधील देशाचे माजी संरक्षणमंत्री रिहो तेरस यांनी केला. युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणाच्या मागचा खरा उद्देश ‘युक्रेनाला ‘नाटो’मध्ये जाण्यापासून रोखणे’, हा होता.

१. सध्या युद्धावर रशियाचे प्रतिदिन १ लाख १२ सहस्र कोटी रुपये व्यय होत आहेत, तर  दुसरीकडे रशियाचे चलन ‘रूबल’चे मूल्य या मासामध्ये १० टक्क्यांनी न्यून झाले आहे. पाश्‍चात्य देशांनी रशियासमवेत डॉलर, युरो आणि पाऊंड यांद्वारे करण्याच्या व्यापारावर बंदी घातली आहे. अशा स्थितीत ‘रूबल’चे मूल्य आणखी घसरू शकते.

२. युद्धच्या ३ आठवड्यांपूर्वीच रशियाच्या आस्थापनांची हानी होण्यास प्रारंभ झाला होता. तेथील शेअर बाजार १० फेब्रुवारीनंतर ४० टक्के घसरला आहे. यामुळे रशियाच्या आस्थापनांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

३. युक्रेनवरील आक्रमणानंतर रशिया नाटोमध्ये सहभागी होण्याच्या विचारात असलेल्या फिनलँड आणि स्विडन या शेजारी देशांवरही आक्रमण करू शकतो. दुसरीकडे युरोप आणि अमेरिका यांनी लादलेल्या वेगवेगळ्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसू लागला आहे.

४. अमेरिकी संरक्षण तज्ञांचा असा दावा आहे की, जर हे युद्ध एक मास चालले, तर रशियाचा लाभ अल्प आणि तोटा अधिक होईल. कीव आणि खारकीव येथे युक्रेनची आघाडी भक्कम रहाण्यासाठी काही युरोपीय देशांनी युक्रेनला शस्त्रपुरवठा चालू केला आहे. आता रशियाला दीर्घकाळ युद्धात गुंतवून ठेवण्याचे युरोपचे उद्दिष्ट आहे.