युक्रेन-पोलंड सीमेवर सुरक्षारक्षकांकडून भारतीय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

कीव (युक्रेन) – युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असतांना भारतीय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची माहिती पीडित विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. युक्रेन-पोलंड सीमेवर युक्रेनच्या सुरक्षारक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना पोलंडमध्ये जाण्याची अनुमती दिली, तर भारतियांना बाजूला काढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

साक्षी इजनकर या विद्यार्थिनीने ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की,

१. आम्ही युक्रेन-पोलंड सीमेवर आल्यावर आम्हाला सुरक्षारक्षकांनी घेरले. आम्हाला पुढे प्रवेश नाकारण्यात आला. तेथून केवळ युक्रेनच्याच नागरिकांना पोलंडमध्ये प्रवेश दिला जात होता. पुष्कळ विनवण्या केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी केवळ भारतीय मुलींना पोलंडमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी भारतीय मुलांना अमानुष मारहाण केली, तसेच त्यांचा छळही केला.

२. यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मुलांनाही पोलंडमध्ये प्रवेश देण्यात आला. आम्ही फारच घाबरलो होतो. पोलंडमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर थातूरमातूर कारणावरून तेथेही मुलांना पुन्हा मारहाण करण्यात आली.

३. त्यानंतर पोलंडच्या सुरक्षारक्षकांना ‘हंटर गेम’ खेळायचा होता. तो काय खेळ असतो, ते मला ठाऊक नव्हते. तेथे गेल्यावर ते लोखंडी सळ्या आणि बंदुका घेऊन उभे होते. ‘हा खेळ खेळल्यावरच तुम्हाला ‘व्हिसा’ (देशात प्रवेश आणि निवास करण्याची अनुमती) मिळेल’, असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनीही विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही मारहाण करतांना मुलगा आहे कि मुलगी हेही त्यांनी पाहिले नाही.