रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि त्याचे जगावर होणारे परिणाम

१. रशियाने तिन्ही बाजूंनी वेढल्यामुळे युक्रेनची कोंडी होणे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘युक्रेनच्या घटना अतिशय वेगाने पुढे जात आहेत. २४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी वक्तव्य केले, ‘त्यांची सेना युक्रेनवर आक्रमण करत आहे.’ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, ‘‘आमच्यावर आक्रमण होत असून संयुक्त राष्ट्र आणि इतरांनी आम्हाला वाचवावे.’’ अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, ‘‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर आम्ही त्यांच्यावर कठोर आर्थिक निर्बंध लादू.’’ युरोपची फ्रान्स आणि जर्मनी ही मोठी राष्ट्रे ‘आम्हीही कठोर निर्बंध लादू’, असे म्हणाले; पण परिस्थिती अशी आहे की, ज्या दोन राज्यांना रशियाने राष्ट्र म्हणून मान्यता दिली होती, तेथे रशियाचे सैन्य घुसले आहे. याखेरीज रशियाने युक्रेनच्या ‘डिजिटल वर्ल्ड’वर किंवा प्रशासकीय प्रणालीवर आतापर्यंतचे सर्वांत मोठे सायबर आक्रमण केले. त्यामुळे युक्रेनची प्रणाली कोलमडून गेली आहे.

२. युक्रेनची लढण्याची क्षमता चांगली असल्याने युद्धात रशियाला पुष्कळ प्रमाणात रक्त सांडवावे लागेल !

रशियाला काय हवे आहे ? तर युक्रेनने ‘‘नाटो’मध्ये (उत्तर अटलांटिक करार संघटना) अजिबात सहभागी होणार नाही, असे आश्वासन द्यावे’, असे रशियाला वाटते. हे आश्वासन देण्यास युक्रेन, नाटो आणि अन्य राष्ट्रे सिद्ध नाहीत. रशियाच्या पारंपरिक युद्धाचे बळ हे रणगाडे आणि तोफा आहे. या युद्धभूमीवर बर्‍यापैकी बर्फ पडलेला आहे. अशा बर्फामध्ये रशियाचे रणगाडे तेवढे यशस्वी होणार नाहीत. त्यामुळे पारंपरिक युद्धात रशियाला फार मोठ्या प्रमाणात किंमत द्यावी लागेल.

पारंपरिक युद्ध म्हटले, तर युक्रेनचे सैन्य हे मोठे आहे आणि त्या सैन्याला अमेरिका अन् ‘नाटो’ राष्ट्रे हे गेल्या दीड वर्षापासून प्रचंड साहाय्य करत आहेत. मग त्यांची लढण्याची इच्छाशक्ती आहे का ? जसे अफगाणिस्तानमधील सैन्याची क्षमता फार होती; परंतु त्याची लढण्याची इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळे त्यांच्या अडीच लाख सैन्याने एकही गोळी न सोडता शरणागती पत्करली. सध्या युक्रेनच्या सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती असेल, तर तेथे रशियाला पुष्कळ रक्त सांडवावे लागेल. युक्रेनची पारंपरिक युद्धासाठीची लढण्याची क्षमता अतिशय चांगली आहे.

(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)

३. बहुतांश राष्ट्रे निष्क्रीय झाल्यामुळे त्यांच्या मिळमिळीतपणाचा रशियावर काडीचाही परिणाम न होणे !

अमेरिका हे शक्तीहीन राष्ट्र झाले आहे. अमेरिकेने आर्थिक निर्बंध लावल्याने पुतिन वठणीवर येण्याची अजिबात शक्यता नाही. सध्या प्रत्येक देश त्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. युरोप, ‘नाटो’ आणि अमेरिका हे फार वर्षांपूर्वी शेवटचे युद्ध लढले आहेत. अमेरिकाही अफगाणिस्तानमधून पळून आली आहे. ते केवळ आर्थिक निर्बंधांवर लढाईच्या गप्पा करत आहेत, ज्याचा रशियावर काडीचाही परिणाम होणार नाही.

युरोप वायू आणि तेल यांसाठी अनुमाने ४० टक्के प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. ते युरोपला एवढ्या अल्प दरात इतरत्र मिळणार नाही. युरोप फारच मिळमिळीत आहे. संयुक्त राष्ट्र ही संरक्षणासाठी जगातील सर्वांत मोठी संस्था आहे; पण ती केवळ ठराव पारित करते. त्यामुळे जग युक्रेनला आर्थिक, शस्त्रे यांचे साहाय्य करेल; पण युद्धात उतरण्याची शक्यता फारच न्यून आहे. रशियाला स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी ही मोठी संधी आहे.

युक्रेनने स्वत:हून ‘नाटो’मध्ये न जाण्याचे मान्य केले, तर ते रशियाला आवडेल. रशियाने स्वत:हून म्हटले आहे, ‘आम्हाला युक्रेनवर राज्य करण्याची इच्छा नाही; पण आम्हाला आमचे राष्ट्रीय हित जपायचे आहे’; पण रशिया म्हणते एक आणि करते निराळे. जसे या शतकातील सर्वांत मोठे जैविक युद्ध चीनने लढले; पण जग त्याला दोष देण्यासही सिद्ध नाही. यावरून रशियाला वाटते, ‘आता जग निष्क्रीय बनलेले आहे आणि त्याला जे हवे आहे, ते करण्याची संधी आहे.’ त्यामुळे येत्या दिवसांमध्ये रशिया अधिक आक्रमक होऊन युक्रेनला नमवण्याचा प्रयत्न करेल.

४. रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर होणारा परिणाम आणि भारताची भूमिका

भारताचे रशिया, युरोप, नाटो अन् अमेरिका हे सर्व मित्र आहेत. त्यामुळे भारताने तटस्थ रहाण्याची भूमिका घेतली आहे. ‘रशियाने आक्रमण करू नये, असा संयुक्त राष्ट्राने ठराव केला आहे. त्यामुळे त्याचे रशियाने पालन करावे’, असे भारताने म्हटले आहे आणि ही भूमिका अगदी योग्यही आहे. भारताने युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि नागरिक यांना देशात परत आणावे. या युद्धामुळे पेट्रोल, डिझेल आणि वायू यांच्या किमती वाढतील. यावर भारत सरकार मार्ग काढेलच; पण प्रत्येकाने ‘देशभक्त नागरिक’ म्हणून भूमिका पार पाडणे आवश्यक आहे.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.