नवी मुंबई – शहरात २ वेगवेगळ्या ठिकाणी अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन आणि बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून ३५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गावर एका नायजेरियन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून २२ लाख रुपयांचे ‘एम्फेटामाईन’ आणि ‘मेथाक्युलॉन’ हे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
पनवेल (आपटा फाटा) येथे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेला बांगलादेशी नागरिक मुसा सुलतान याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १३ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे आरोपीवर एन्.डी.पी.एस्. कायदा, पारपत्र नियम, परकीय नागरिकांचा कायदा या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपीला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.