नगर – बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षची जिहादी प्रवृत्तीच्या इस्लामिक संघटनेच्या व्यक्तींनी निर्घृण हत्या केली. ही घटना मानवतेच्या दृष्टिकोनातून निषेधार्थ आहे. जिहादी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सिमीप्रमाणे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, डेमोक्रटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालावी आणि कार्यकर्त्यांची हत्या करणार्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे प्रांत धर्मप्रसारक सहप्रमुख डॉ. मिलिंद मोभारकर यांनी केली. येथे विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, रा.स्व. संघ, शिवसेना, भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या वेळेस ते बोलत होते.
या वेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले, ‘‘या घटनेचा शिवसेना तीव्र निषेध करते. हत्या करणार्यांना फाशीची शिक्षा दिल्यास अशा घटना पुन्हा होणार नाहीत, तसेच हर्षच्या कुटुंबाला केंद्र सरकाने ५० लाख रुपये साहाय्य द्यावे आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीस सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत.’’
रा.स्व. संघाचे जिल्हा कार्यवाहक श्रीकांत जोशी म्हणाले की, हर्ष यांना हिंदु धर्मासाठी हौतात्म्य पत्करावे लागले. हिंदू समाजाने एकत्र येऊन जिहादी धर्मांध शक्तींच्या विरोधात लढा उभारला पाहिजे आणि सर्व जात पात सोडून एक हिंदु म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे.
या वेळी भाजप नगरसेवक भैया परदेशी, बजरंग दल जिल्हा सहमंत्री गौतम कराळे मंदिर समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे, शिवसेना माजी महापूर अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, हिंदु जनजागृती समितीच्या प्रतीक्षा कोरगावकर, संतोष गवळी, श्री शिवप्रतिष्ठानचे अरुण ठाणगे आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.