|
जालना – घटती रुग्णसंख्या आणि कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. मार्च मासात महाराष्ट्र निर्बंधमुक्त होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी येथे दिले; मात्र मास्क लावणे अनिवार्य आणि सामाजिक अंतर कायम रहाणार आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कोरोना कृती दलही निर्बंध हटवण्याविषयी अनुकूल आहे; परंतु निर्बंध पूर्णपणे हटवण्याविषयी मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील. राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असून २१ फेब्रुवारी या दिवशी ८०६ कोरोनाचे नवे रुग्ण, तर ५३ ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली. २ सहस्र ६९६ लोक कोरोनामुक्त झाले असून ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्के आहे. राज्यात सध्या १४ सहस्र ५२५ रुग्ण उपचार घेत आहेत.
पोलिसांचा अहवाल आल्यानंतरच आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेविषयी निर्णय !राजेश टोपे म्हणाले की, पोलीस विभागाचा अहवाल आल्यानंतरच आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेविषयी निर्णय घेतला जाईल. गृहमंत्र्यांशी याविषयी चर्चा झाली असून पोलिसांचा अहवाल आल्यास त्वरित निर्णय घेण्याची राज्य सरकारची इच्छा आहे. गत २ मासांपूर्वी झालेल्या आरोग्य परीक्षेत अपप्रकार आढळून आले होते. |