छत्रपती शिवरायांप्रमाणे कृती करा !

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी दिनांकानुसार साजरी झाली. त्यानंतर महाराष्ट्रात शिवरायांचे पुतळे बसवण्यावरून आणि जयंती साजरी करण्यावरून राजकारण चालू झाले आहे. सातारा, अमरावती, दर्यापूर आणि जालना जिल्ह्यातील सेवली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आल्यानंतर तो प्रशासनाने हटवला. संभाजीनगर येथेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य २१ फुटी अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणावरून राजकीय पक्ष आणि संघटना यांच्यात मतभेद दिसून आले. रात्रीच्या वेळी पुतळ्याच्या अनावरणास विरोध असतांनाही लोकप्रतिनिधींच्या हस्ते रात्रीच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. खरेतर शास्त्रानुसार सकाळी अथवा दुपारी शुभदिवशी पुतळ्याचे अनावरण करणे आवश्यक होते; मात्र केवळ राजकीय वर्चस्वामुळे तसे झाले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि त्यांचे पुतळे यांवरून होणारे वाद महाराष्ट्राला नवीन नाहीत. राजकारणातही त्याचे अनेकदा प्रतिबिंब दिसून आले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कधी ना कधी महाराजांचे नाव, प्रतिमा आणि पुतळे यांचा वापर राजकारणासाठी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक अशा महापुरुषांची केवळ प्रतिके उभारण्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात् करण्यावर भर द्यायला हवा, असे नेहमी सांगितले जाते; पण प्रत्यक्षात तसे होत नाही, हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचे रान केले, तसेच मावळ्यांना समवेत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा’ पिढ्यान्पिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्रोत राहिला. अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणार्‍या परकीय राजवटीविरुद्ध महाराज लढले अन् त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदु धर्माचे रक्षण केले. महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीही थारा दिला नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गुण आपल्यामध्ये किती प्रमाणात आहेत ? याचा विचार व्हायला हवा. नुसती शिवजयंती साजरी करणे, ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणा देणे आणि पुतळे बसवणे यांवरून राजकारण करून शिवरायांचे विचार कृतीत येतील का ? महाराजांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले, तरच पुतळे उभारल्याचे सार्थक होईल. हा आदर्श शासनकर्त्यांनी समाजासमोर ठेवणे अपेक्षित आहे.

– श्री. सचिन कौलकर, मुंबई.