१० रुपयांची नाणी स्वीकारण्याविषयी शिखर बँकेने आदेश द्यावेत !

हिंदु जनजागृती समितीची सुराज्य अभियानाच्या अंतर्गत मागणी !

शिखर बँकेचे व्यवस्थापक (लिड बँक मॅनेजर) एस्.वाय. पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना सुराज्य अभियानाचे राजेंद्र सांभारे

सातारा, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – भारतीय रिझर्व्ह बँकेने १० रुपयांची सर्व नाणी स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत; मात्र सर्व दुकानदार आणि विक्रेते या आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. काही अधिकोषातही १० रुपयांची नाणी घेण्यास नकार देण्यात येतो. त्यामुळे १० रुपयांच्या नाण्यांविषयी भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले आदेश दुकानदार आणि विक्रेते यांच्यापर्यंत पोचतील आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी त्वरित आदेश काढण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा शिखर बँकेचे व्यवस्थापक (लिड बँक मॅनेजर) एस्.वाय. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत हे निवेदन देण्यात आले. या वेळी सुराज्य अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र सांभारे उपस्थित होते.

निवेदनामध्ये म्हटले आहे,
१. भारतीय चलन पद्धतीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वेगवेगळ्या प्रसंगी १४ प्रकारची १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. १० रुपयांची सर्व नाणी वैध असूनही समाजात पसरलेल्या अफवा आणि गैरसमज यांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी १० रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात.

२. नागरिकांना याविषयी स्पष्टता नसल्याने त्यांच्याकडे १० रुपयांची नोट देण्याविना अन्य पर्याय उरत नाही, तसेच त्यांच्याकडे केवळ नाणी असल्यास त्यांच्या खरेदी करण्यावर बंधने येतात. १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍या व्यक्तींच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होईल, असे निर्देशही भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार करून संबंधित दुकानदार, विक्रेते यांच्याविरुद्ध तक्रार केल्यास शिक्षेचे प्रावधानही आहे.

३. शिखर बँकेने आदेश काढून १० रुपयांची नाणी घेण्यास नकार देणार्‍या सर्व दुकानदार, विक्रेते यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, हे आदेशात स्पष्टपणे नमूद करावे. या संदर्भात नागरिकांचे जे अधिकार आहेत, त्याविषयी सर्व नागरिकांत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, स्थानिक केबल नेटवर्क, होर्डिंग, प्रसिद्धीपत्रक इत्यादी माध्यमांतून व्यापक प्रमाणांत प्रसिद्धी करावी.