हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याने पालकांमध्ये अप्रसन्नता !
पणजी, २१ फेब्रुवारी (वार्ता.) राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुमारे २ वर्षांच्या खंडानंतर २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाले. राज्यातील सुमारे २ लक्ष ७० सहस्र विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती लावली. वर्गाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला. राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर सजावट करण्यात आली होती, तर काही ठिकाणी संगीतही लावण्यात आले होते. राज्यात काही ठिकाणी पूर्वप्राथमिक वर्गही चालू करण्यात आल्याचे वृत्त आहे. सर्वच ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियम उदा. शाळेत प्रवेश करतांना शरिराचे तापमान तपासणे, ‘हँड सॅनिटाईझर’चा वापर करणे, शाळा निम्म्या क्षमतेने भरणे आदी नियमांचे पालन करण्यात आले. शिक्षण खात्याच्या आदेशानुसार शाळांत विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती केलेली नाही, तसेच सर्व परीक्षा प्रत्यक्ष स्वरूपात घेतल्या जाणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार वास्को, तसेच राज्यातील अन्य काही ठिकाणी शाळेच्या व्यवस्थापनाने ‘शाळेमध्ये पालक पाल्याला स्वत: जोखीम पत्करून पाठवत आहेत’, अशा हमीपत्रावर स्वाक्षरी घेण्यास प्रारंभ केल्याने पालकांमध्ये नाराजाची सूर उमटला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार पालकांकडून अशा स्वरूपाचे हमीपत्र घ्यायचे कि नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारवर सोपवण्यात आला आहे. शिवसेनेचे गोवा विभाग प्रमुख जितेश कामत यांनी संबंधित शाळांच्या पालकांनी हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्याच्या शाळेच्या व्यवस्थापनाच्या कृतीचा निषेध करून हा प्रकार बंद करण्याची मागणी केली आहे.