चीनकडून आर्थिक साहाय्य स्वीकारतांना संबंधित देशांनी सतर्कता बाळगावी ! – भारत

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

म्युनिच (जर्मनी) – भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील सुरक्षा परिषदेच्या चर्चेमध्ये चीनचा थेट उल्लेख न करता ‘चीनकडून मिळणारे आर्थिक साहाय्य स्वीकारण्याआधी त्याविषयी योग्य ती माहिती करून घ्या. कर्ज घेण्याआधी त्याचे लाभ आणि तोटे याची आकडेमोड करूनच पुढील निर्णय घ्यावा’, असे आवाहन केले आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मेमन यांनी ‘बांगलादेशला मूलभूत प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असून चीन फारच अल्प अटींवर सहज भरपूर आर्थिक साहाय्य करण्यास सिद्ध आहे. इतर देश कर्ज देतांना बर्‍याच अटी ठेवतात’, असे विधान केले होते. त्यानंतर जयशंकर यांच्या झालेल्या भाषणात यांनी वरील विधान केले.

जयशंकर पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संबंध फारच स्पर्धात्मक बनले आहेत. प्रत्येक देश योग्य वेळेची वाट पहात असतो. ‘आपण कसे पुढे जाऊ शकतो ?’ हेच प्रत्येक देश बघत असतो. नेहमीच सर्वच राष्ट्रांच्या डोक्यामध्ये इतर राष्ट्रांना साहाय्य करतांना स्वत:चा लाभ करून घेण्याचा उद्देश असतो. कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेले अनेक देश आम्ही पाहिले आहेत. त्यांपैकी अनेक देश हे आशियामध्येच आहेत. या देशांनी कर्ज घेऊन असे प्रकल्प उभे केले, जे व्यवसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले नाहीत. अशी विमानतळे बनवली, जेथे एकही विमान उतरत नाही. अशी बंदरे बांधली, जेथे एकही नौका आली नाही. मला वाटते चीनच्या कर्जाच्या जाळ्यात आडकण्याआधी देशांनी ‘आपण काय आणि कशासाठी करत आहोत ?’ या स्वत: विचार करणे आवश्यक आहे. अयशस्वी प्रकल्पांच्या कर्जाच्या बदल्यात त्या देशांना प्रकल्पातील भागीदारी द्यावी लागते.

चीनचा कर्ज देऊन शेजारी देशांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न

चीन भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करत आहे. आपल्या मित्र देशाला, म्हणजेच पाकिस्तानलाही चीनने मोठे आर्थिक साहाय्य केले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग सिद्ध केला जात आहे. श्रीलंकेतील हंबरटोटा आणि कोलंबो बंदरांवरही चीनने नियंत्रण मिळवले आहे. बंगलादेशमधील तिस्ता नदीच्या योजनेसाठी चीनने ७५० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यातून चीन कर्ज देऊन शेजारी देशांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड होते.