५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला श्रीरामपूर, जिल्हा संभाजीनगर येथील कु. वरद प्रणव चरखा (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वरद प्रणव चरखा हा एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

माघ कृष्ण पक्ष तृतीया (१९.२.२०२२) या दिवशी कु. वरद प्रणव चरखा याचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि त्याच्या वडिलांचे संभाजीनगर येथील मित्र श्री. शशांक देशमुख या साधकाला वरदची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. वरद चरखा

कु. वरद प्रणव चरखा याला ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. सतमध्ये रहाणे

श्री. प्रणव चरखा

१ अ १. सात्त्विक ग्रंथांचे वाचन करणे : ‘गरोदरपणात संपूर्ण ९ मास देवाने माझ्याकडून भागवत आणि प.पू. गजानन महाराज यांच्या ग्रंथांचे नियमित पारायण करून घेतले.

१ अ २. सतत नामजप करणे : नामजपाच्या यंत्रावर सतत श्रीकृष्णाचा नामजप चालू असे. माझ्याकडूनही तो नामजप सतत होत होता.’

– सौ. प्रियांका प्रणव चरखा (वरदची आई), श्रीरामपूर (जि. अहमदनगर)

१ आ. पत्नी गरोदर असल्यापासून प्रतिदिन गोसेवा घडणे : ‘पत्नी गरोदर असतांना आम्ही दोघे (पती-पत्नी) नियमितपणे पायी फिरण्यासाठी जात असू. तेव्हा मार्गात एके ठिकाणी एक गाय बांधलेली असे. आम्ही केव्हाही त्या गायीपर्यंत पोचलो की, ती गाय गोमूत्र किंवा शेण देत असे. आम्ही दिवसातून कोणत्याही वेळी त्या गायीच्या जवळून जात असलो, तरी हीच अनुभूती येत असे. तेव्हा ‘येणारे बाळ सात्त्विक असणार’, असे मला जाणवायचे. आम्ही त्या गायीला चारा घालायला आरंभ केला. तेव्हापासून आजपर्यंत देव आमच्याकडून नियमित गोसेवा करवून घेत आहे.’

– श्री. प्रणव चरखा (वरदचे वडील), श्रीरामपूर (जि. अहमदनगर)

२. प्रसुती

सौ. प्रियांका चरखा

‘प्रसुतीच्या सुमारास माझ्या माहेरी सर्वत्र मार्गाचे (रस्त्यांचे) काम चालू होते. मार्गावर सर्वत्र ५ – ६ फूट खड्डे होते. अशा सर्व परिस्थितीत मी रुग्णालयात पोचले आणि बाळाचा सुखरूप जन्म झाला. तेव्हा माझ्या आईला ‘साक्षात् कृष्णाचा जन्म होत आहे’, असे जाणवले. ती मला म्हणाली, ‘‘बाळाच्या रूपात श्रीकृष्णच आला आहे.’’ – सौ. प्रियांका प्रणव चरखा

३. वय जन्म ते ३ मास

३ अ. मुद्रा करणे : ‘जन्मापासूनच झोपेत बाळाच्या दोन्ही हातांच्या मुद्रा असायच्या. त्याच्याकडे पाहिल्यावर ‘तो ध्यानावस्थेत आहे’, असे मला वाटायचे आणि माझ्या मनाला स्थिरता जाणवायची.’ – श्री. प्रणव चरखा

३ आ. अनुभूती

३ आ १. सासूबाई संभाजीनगर येथील श्री वरद गणपति मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर त्यांना ‘वरद’, असा आवाज ऐकू येणे, तेव्हा देवाने बाळाचे नाव ‘वरद’ ठेवायला सुचवले’, असे त्यांना जाणवणे : ‘माझ्या सासूबाई सौ. मंगला चरखा या नियमितपणे संकष्टी चतुर्थीला संभाजीनगर येथील श्री वरद गणपति मंदिरात दर्शनासाठी जातात. बाळाच्या नामकरणाच्या आधी त्या देवळात गेल्या होत्या. त्या वेळी तेथे श्री गणेशाला प्रदक्षिणा घालतांना त्यांना अकस्मात् ‘वरद’, असा आवाज ऐकू आला. तेव्हा ‘देवानेच बाळाचे नाव ‘वरद’ ठेवण्यास सुचवले’, असे वाटून आम्ही बाळाचे नाव ‘वरद’ ठेवले.’

३ आ २. नामकरणाच्या वेळी बाळाला सजवलेल्या टोपलीत ठेवून नामकरण स्थळी नेतांना हलकासा पाऊस येणे : ‘बाळाच्या नामकरणाच्या वेळी टोपली सजवून त्याच्या आजोबांनी (आईच्या वडिलांनी) त्याला टोपलीत ठेवून नामकरणाच्या ठिकाणी नेले. तेव्हाही अकस्मात् ५ – १० मिनिटे पावसाच्या हलक्या सरी आल्या. त्या वेळी आकाशात एकीकडे सूर्यनारायणही दिसत होता. ते पाहून ‘देव बाळाला आशीर्वाद देत आहे’, असे मला वाटले. तेव्हा आई म्हणाली, ‘खरंच बाळाच्या रूपात कृष्णच आला आहे.’ त्यामुळे बाळाचे एक नाव ‘माधव’, असेही ठेवण्यात आले आहे.’

– सौ. प्रियांका प्रणव चरखा

४. वय ४ मास ते १ वर्ष

४ अ. जावळ काढण्यासाठी मंदिरात गेल्यावर देवीचा अभिषेक आणि दर्शन होईपर्यंत वरद शांत असणे : ‘वरद ११ मासांचा असतांना त्याचे जावळ काढण्यासाठी गेल्यावर देवीचा अभिषेक आणि दर्शन होईपर्यंत तो शांत होता. त्याने कोणताही त्रास दिला नाही. पूर्ण वेळ तो सर्व निरीक्षण करत होता.

४ आ. अनुभूती : देवीच्या अभिषेकासाठी वरदचे आवरत असतांनाही हलकासा पाऊस येणे : देवीच्या अभिषेकासाठी जातांना वरदचे आवरत असतांना काही वेळ हलका पाऊस पडत होता. ‘त्याच्या काही विशेष प्रसंगी पावसाचा ऋतु नसतांनाही हलका पाऊस येतो’, याची अनुभूती येते. त्यामुळे ‘पावसाच्या रूपात देव त्याला आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवते.

५. वय २ ते ४ वर्षे

५ अ. आई-वडील गणेशयागाला बसल्यावर याग संपेपर्यंत वरद शांत बसणे : वरद २ वर्षांचा असतांना आम्ही गणेशयागाला बसलो होतो. तेव्हा वरदने कोणताही त्रास दिला नाही. तो शांतपणे बाजूला बसून होता. ‘आतापर्यंत आम्ही अशा कोणत्याही यज्ञासाठी बसल्यावर तो नेहमीच शांत बसतो’, असे आमच्या लक्षात आले आहे.

५ आ. स्वावलंबी : वरद साधारण २ वर्षांचा असल्यापासून स्वतःच्या हाताने जेवतो.’

– श्री. प्रणव चरखा

५ इ. साहाय्य करण्याची वृत्ती : ‘वरद ३ वर्षांचा असल्यापासून तो घरकामात त्याला जमेल, तसे साहाय्य करतो.’ – सौ. प्रियांका प्रणव चरखा

६. वय ५ ते ७ वर्षे

६ अ. उत्साही : ‘वरद सतत उत्साही असतो. तो दिवसभर झोपत नाही. कोणतीही कृती करायला तो सदैव तत्पर असतो.

६ आ. उत्तम स्मरणशक्ती : त्याला गणपतिस्तोत्र, मारुतिस्तोत्र, रामरक्षा, गीतेचा १५ वा अध्याय, हे सर्व मुखोद्गत आहे. तो नियमितपणे रामरक्षा आणि कोरोनाच्या विरोधात प्रतिकारक शक्ती आणि आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी असलेला मंत्रजप करतो.

६ इ. सहनशील : तो ५ वर्षांचा असतांना एकदा त्याच्या पायावर उकळलेले पाणी सांडले होते. तेव्हा तो थोडासा रडला; पण लगेच शांतही झाला. त्याने त्या वेदना सहन केल्या.’

– श्री. प्रणव चरखा

६ ई. सेवाभाव : ‘जून २०२१ मध्ये वरदची आजी (वडिलांची आई) पायर्‍यांवरून पडल्यामुळे त्यांच्या पायाचा अस्थिभंग झाला होता. त्यामुळे त्यांना काही मास पूर्ण आराम करायचा होता. तेव्हा त्यांच्या पायाला मलम लावण्ो, त्यांना घरात फिरत्या आसंदीवरून (व्हिलचेअर) फिरवणे, औषधे देणे, पायाला पट्टा बांधून देणे इत्यादी सेवा त्याने आनंदाने आणि उत्साहाने केल्या.’ – श्री. प्रणव चरखा आणि श्री. शशांक देशमुख (श्री. प्रणव यांचे मित्र), संभाजीनगर

६ उ. देवाची ओढ

१. ‘तो प्रतिदिन सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मी…, समुद्रवसने देवी…’, अंघोळ करतांना ‘गंगेच् यमुने …, सूर्यमंत्र, जेवतांनाचे श्लोक, सायंकाळचे श्लोक, झोपतांना कृष्णाचा श्लोक इत्यादी सर्व नियमितपणे म्हणतो. तो गाडीवरून जाता-येता आकाशदेव, वायुदेव आणि सूर्यदेव यांना प्रार्थना करतो.

२. त्याला श्रीकृष्णाचा पाळणा ऐकायला आवडतो. तसेच त्याला श्रीकृष्णाचा नामजपही करायला आवडतो.

३. मी काही दिवसांपूर्वी सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे मोठे चित्र ‘फ्रेम’ करून आणले. वरदला ते पुष्कळ आवडले. तो दिवसभर ते चित्र घरात सर्वत्र समवेत घेऊनच फिरत होता. त्या चित्राच्या समवेत तो दिवसभर खेळत होता. त्याला त्या संदर्भात विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘श्रीकृष्ण माझ्याशी बोलतो.’’

४. मी वरदला नियमितपणे येथील ‘सुपारी मारुति मंदिरा’त दर्शनासाठी घेऊन जातो. त्या मारुतीचे त्याला सूक्ष्मातून दर्शन होते आणि तो सूक्ष्मातून मारुतीशी संभाषण करतो.

६ ऊ. वरदचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव : तो स्वतःहून अधूनमधून ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातो.

७. अनुभूती

‘वरदसमवेत नामजप फार छान होतो’, अशी अनुभूती येते.’

– श्री. प्रणव चरखा

८. जवळीक साधणे

‘वरदचे बोलणेही मधुर आहे. तो त्याच्या प्रेमळ वागण्या-बोलण्याने इतरांना आपलेसे करतो. त्याच्या घरी गेल्यावर तो आवर्जून मला त्याच्या अभ्यासाच्या वह्या दाखवतो.

९. समंजस

‘तो वयाच्या मानाने समंजस आहे’, असे मला जाणवते. माझे साहित्य वितरण केंद्र आहे. एकदा त्याने मला एक वस्तू आणायला सांगितली होती. ती वस्तू त्याला द्यायला मला २ – ३ दिवस लागले. प्रत्येक वेळी मी ती वस्तू न्यायला विसरायचो. तेव्हा प्रत्येक भेटीत तो मला त्या वस्तूची आठवण करून द्यायचा; मात्र मी ती वस्तू विसरत असल्याविषयी त्याचे कोणतेही गार्‍हाणे नसायचे. ‘मी ती वस्तू आणायला विसरलो आहे’, हे तो मनापासून स्वीकारायचा आणि पुन्हा प्रेमाने अन् आनंदाने मला आठवण करून द्यायचा.

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणे

वरदमध्ये प.पू. गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) भाव जाणवतो. तो प.पू. गुरुदेवांशी संभाषण करतो, ‘तुम्ही कसे आहात ?’, अशी त्यांची विचारपूस करतो. तेव्हा ‘तेही त्याच्याशी बोलतात’, अशी त्याला अनुभूती येते. ‘वरद देवाच्या अनुसंधानात असतो’, असे मला जाणवते.

‘वरदची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, असे मला जाणवते.’

– श्री. शशांक देशमुख, संभाजीनगर

११. स्वभावदोष

‘हट्टीपणा आणि राग येणे

१२. कृतज्ञता

आमची काहीही पात्रता नसतांना देवाने आम्हाला इतक्या सात्त्विक बाळाला सांभाळण्याची सेवा दिली, त्यासाठी प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रणव आणि सौ. प्रियांका प्रणव चरखा, श्रीरामपूर, अहमदनगर. (५.२.२०२२)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक