पवित्र नद्या प्रदूषणमुक्त करा !

नोंद 

 

पंढरपूर येथे नुकतीच माघ वारी पार पडली. विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे वारकरी पवित्र समजल्या जाणार्‍या चंद्रभागा नदीत स्नान करतात, तर अनेक जण हे पाणी तीर्थ म्हणूनही घेऊन जातात; मात्र या वारीच्या निमित्ताने चंद्रभागा नदीचे प्रदूषण हा विषय परत एकदा ऐरणीवर आला. वारीच्या आदल्याच दिवशी चंद्रभागा नदीचे पाणी तीर्थ म्हणून नाही, तर स्नान करण्यासाठीही धोकादायक असल्याची माहिती समोर आली. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी पाण्याचे काही नमुने चाचणीसाठी पाठवले होते. त्याचा भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालात ‘हे पाणी शेवाळ, माती, अळ्या-किडे यांनी युक्त, तसेच सांडपाणीमिश्रित आहे’, असे गणेश अंकुशराव यांनी सांगितले.

चंद्रभागा नदी ही भाविकांच्या श्रद्धेचा विषय असून ती वर्षभर स्वच्छ कशी राहील ? भाविकांना स्वच्छ पाणी कसे मिळेल ? याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे; परंतु तसे होतांना दिसत नाही. वर्ष २०१८ मध्येही नदीची अशीच गंभीर स्थिती होती. तेव्हा पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण शून्यावर पोचले होते, तर प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली होती.

कोल्हापूर येथील पंचगंगेच्या नदीमध्येही पाण्यातील प्राणवायू अल्प झाल्याने अनेक मासे मृत्यूमुखी पडले होते. हा प्रकार गेल्या ३ वर्षांपासून चालू आहे. सांगली शहरातील कृष्णा नदीची अवस्थाही यापेक्षा काही वेगळी नसून १४ फेब्रुवारीपासून औद्योगिक क्षेत्रासह विविध भागांतील सांडपाणी वाहून नेणारा शेरीनाला नदीपात्रात मिसळण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे नागरिकांना आता शेरीनालामिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे.

या तिन्ही नद्यांच्या प्रदूषणाचे प्रश्न जुने असून हिंदूंच्या गणेशोत्सव काळात नदी प्रदूषणासाठी अत्यंत दक्ष (?) असणारे प्रदूषण मंडळ अन्य वेळी महापालिका, औद्योगिक वसाहती, तसेच अन्य यांना केवळ नोटिसा पाठवण्याचा सोपस्कार पार पाडते, तेही कुणीतरी आंदोलन किंवा मोर्चे काढल्यावर, हे चिंताजनक आहे. भारतामध्ये नद्यांचे आध्यात्मिक माहात्म्य अनन्यसाधारण आहे. समाजामध्ये याविषयी श्रद्धा आहे आणि ते त्यादृष्टीने नद्यांकडे पहातात. प्रशासनाने भाविकांचा भाव आणि स्वच्छ पाणी ही प्राथमिक आवश्यकता समजून नद्या समयमर्यादा ठेवून स्वच्छ कराव्यात, हीच अपेक्षा !

– श्री. अजय केळकर, सांगली.