महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष ! – प्रवीण दरेकर, भाजप

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

सातारा, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारा शहराच्या सीमावाढीनंतर नगोरोत्थान अंतर्गत एक रुपयाचाही निधी शहराला प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव प्रयत्न होतांना दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे, अशी परखड टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. शासकीय दौर्‍यावर असतांना येथील विश्रामगृहातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच दबदबा ठेवला आहे, असे म्हटले जाते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कारखानदारीकडे दुर्लक्ष केले आहे. केंद्रशासनाच्या योजनांमुळे साखर कारखानदारीला संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत. जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून योजनेचे नियम डावलून अनेक संस्थांना कामे देण्यात आली आहेत. एस्.टी. विलीनीकरणाच्या संदर्भात शासनाचे धोरण सुस्पष्ट नाही. त्यामुळे एस्.टी. कर्मचारी प्रचंड अडचणीत आहेत. या सर्वच प्रश्नांवर विधानसभेत देवेंद्र फडणवीस, तर विधान परिषदेमध्ये मी आवाज उठवणार आहे.’’