आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरावा !

राहुल गांधी आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सैन्याने पाकमध्ये जाऊन केलेल्या आक्रमणाच्या संदर्भात मागितलेल्या पुराव्यांचे प्रकरण

नवी देहली – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना उद्देशून भारतीय सैन्याने वर्ष २०१९ मध्ये पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईक’चे व्हिडिओ ‘कू’ या सामाजिक सैन्यमाद्वारे प्रसारित केले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सैन्याने पाकमध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे सरकारकडे पुरावे मागितले होते. तेव्हा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गांधी यांचे समर्थन करत त्यांनी केलेली मागणी योग्य असल्याचे म्हटले होते.

१. हिमंत बिस्व सरमा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा हा घ्या पुरावा ! असे असूनही तुम्ही भारतीय सैन्यदलांच्या शौर्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहात. तुम्ही सैन्याला अपमानित करण्यासाठी एवढे हतबल का झाले आहात ? ‘नवा भारत’ तुम्ही सैन्याचा केलेला अवमान सहन करणार नाही !’

२. राव यांनी याआधी म्हटले होते, ‘भारत सरकारला पुरावा दाखवू दे. त्याचे हे दायित्व आहे. लोकांमध्ये याविषयी संभ्रम आहे. भाजप खोटा प्रचार करत असल्यामुळे जनता पुरावे मागत आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही राजा अथवा सम्राट असू शकत नाही !’