शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका !

मुंबई – शिवाजी पार्कची ओळख ‘खेळाचे मैदान’ अशीच रहावी. या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही महनीय व्यक्तीचे स्मारक मैदानातील जागेत बांधण्यात येऊ नये, अशी जनहित याचिका प्रकाश बेलवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. प्रकाश बेलवाडे हे शिवाजी पार्क येथील रहिवासी असून त्यांच्या वतीने अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी ही याचिका केली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की,

१. लता मंगेशकर यांचे भारतीय संगीतातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे; परंतु शिवाजी पार्क येथे त्यांचे स्मारक बांधल्यास चुकीचा पायंडा पडेल.

२. शिवाजी पार्क येथील मोकळ्या हवेत नागरिक फेरफटका मारण्यासाठी जातात. बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिणामी स्थानिकांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. अंत्यसंस्कारानंतर २ दिवस मैदान खेळण्यासाठी बंद ठेवण्यात आले. प्रदूषणाचे सूत्रही आहेच.

३. मुंबई उच्च न्यायालयाने वर्ष २००९ मध्ये स्वत: प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देतांना ‘शिवाजी पार्क हे खेळासाठीच वापरले जावे’, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कची ‘खेळाचे मैदान’ अशी ओळख पालटली गेली, तर ते न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात होईल. शिवाजी पार्कची खेळाचे मैदान ही ओळख कायम ठेवण्यासाठी यापुढे कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीवर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत किंवा तेथे स्मारके बांधली जाऊ नयेत.