समता आणि राष्ट्रीय ऐक्य यांसाठी गणवेशाची कार्यवाही (अंमलबजावणी) करा ! – सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी देहली – समता आणि राष्ट्रीय ऐक्य यांना चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी अन् विद्यार्थी यांच्यासाठी समान गणवेशाची कार्यवाही (अंमलबजावणी) करावी आणि त्यासाठी केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. निखिल उपाध्याय यांनी अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय आणि अधिवक्ता श्री. अश्‍विनी दुबे यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट केली आहे.

या याचिकेत ‘विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, बंधूभाव अन् राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी न्यायालयीन आयोग किंवा तज्ञ यांची समिती स्थापन करण्यासाठी केंद्राला निर्देश द्यावेत. घटनेचे आणि मूलभूत अधिकारांचे रक्षक म्हणून भारतीय विधी आयोगाला ३ मासांमध्ये उपाययोजना सूचवणारा अहवाल सिद्ध करण्याचा निर्देश देण्यात यावा’, अशीही मागणी करण्यात आली आहे.