गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. लताताईंचा ‘दैवी’ आवाज हीच त्यांची ओळख होती. याठिकाणी ‘दैवी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यांच्या आवाजाचे वर्णन करतांना अनेक जण ‘लतादीदींचा आवाज ‘दैवी’ आहे’, ‘त्यांना दैवी देणगी मिळालेली होती’, ‘लतादीदी गानसरस्वती होत्या’, अशा प्रकारचे शब्द वापरत होते आणि आपण सर्वांनीही त्याचा अनुभव घेतलेला आहे.
रसिकांच्या मनावर ८ दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणार्या लतादीदींना श्रद्धांजली वहातांना वापरलेले शब्दही आध्यात्मिक स्तरावरील होते. ‘स्वरस्वती इंद्रलोकी परतली’, ‘गानसरस्वती स्वगृही म्हणजेच स्वर्गलोकी परतली’, ‘श्रीकृष्णाची बासरी लुप्त झाली’, ‘देशाचा अमृत आवाज अनंतात विलीन झाला’, ‘स्वर अमर आहेत’, ‘लतादीदी इंद्राच्या दरबारी विशेष सिंहासनावर रुजू होण्यासाठी गेल्या’, ‘लतादीदींचे स्वर सूर्य, चंद्र असेपर्यंत रहातीलच, त्यांच्या जीवनाचा प्रवास संपला, तरी गाण्यांच्या सुरांचा प्रवास कसा संपेल ? तो गंगा यमुनेप्रमाणे वहातच रहाणार’, ‘अमृतमय स्वरांचा एक निरंतर प्रवाह; म्हणून जगभरात वहात राहिल’, या आणि यांसारख्या अनेक आध्यात्मिक शब्दांच्या बिरुदावल्या त्यांना लावण्यात आल्या.
लतादीदींचा ‘गाणे ही संगीताची साधना आहे आणि ती सरस्वतीची पूजा आहे’, असा भाव होता. संगीतातील अवघड रचना त्यांच्या गळ्याने सोप्या केल्या होत्या. संगीतातील शिक्षण घेऊन आणि अपार कष्ट घेऊन मिळालेल्या दैवी आवाजाला लतादीदींनी जगभरात पोचवले. देवाने निर्माण केलेल्या ‘दैवी’ आवाजाचे महत्त्व आणि अद्वितीयत्व शब्दात वर्णन करू शकत नाही. ते अनुभवायचेच आहे. भगवंताने मनुष्य आणि सृष्टीची केलेली निर्मिती ही पण एक दैवी लीलाच आहे. बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी भगवंताचे अस्तित्व नाकारण्याचे कितीही ढोल वाजवले, तरी भगवंताचे अस्तित्व दुर्लक्षिले जाऊ शकत नाही. त्यातील एक उदाहरण म्हणजे लतादीदींचा दैवी आवाज !
लतादीदींच्या जाण्यानंतर आशा भोसले म्हणाल्या, ‘‘देवाने एक परफेक्ट गळा सिद्ध केला आणि आता तो साचाच मोडून पडला. मग दुसरी लता मंगेशकर कशी सिद्ध होणार ?’’ हे खरे आहे. भगवंताने ठरवले, तरच ‘दुसरी लता’ सिद्ध होऊ शकते अन्यथा कुणा मनुष्याचे हे कर्तृत्व नाही, हेच निर्विवाद सत्य आहे !
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.