सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर २ गटांमध्ये हाणामारी !

सातारा, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर २ गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. सामाजिक माध्यमांतून याविषयीची दृश्ये प्रकाशित झाल्यानंतर पोलिसांना याविषयी कळाले. विशेष म्हणजे २०० मीटर अंतरावरच निर्भया पथकाचे पोलीस ठाणे आहे; तरीही याविषयी पोलिसांना तत्परतेने काहीच कळले नाही. (जवळच पोलीस ठाणे असूनही पोलिसांना माहिती नसणे हे पोलिसांच्या निष्क्रीयतेचे लक्षण आहे. हे पोलीस खात्याला लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)

१० फेब्रुवारी या दिवशी सकाळी महाविद्यालयासमोर २ गट समोरासमोर आले. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे होती. २ गटांत अचानक वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. हाणामारीतील युवक एका लेडीज शॉपीच्या दिशेने धावत गेला. युवकाला मारहाण करण्याच्या नादात मारहाण करणार्‍या युवकांनी लेडीज शॉपी फोडली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते; मात्र जवळच निर्भया पोलीस ठाणे असूनही त्यांना याविषयी काहीच समजले नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही गटांतील युवकांनी पलायन केले आहे.