अवैध सावकारीमुळे पुणे येथील महिलेवर आलेली भीक मागण्याची वेळ टळली !

अवैध सावकारी करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी ! – संपादक 

पुणे – अवैध सावकारीमुळे येथील वयोवृद्ध महिलेवर भीक मागण्याची वेळ आली होती; मात्र जागरूक नागरिक आणि खडक पोलीस यांमुळे तिची यातून सुटका झाली. दिलीप वाघमारे या सावकाराने ४० सहस्र रुपये कर्जाच्या बदल्यात या वयोवृद्ध महिलेकडून अनुमाने ८ लाख रुपये उकळले. त्याच्यावर अवैध सावकारीचा गुन्हा नोंद करून खडक पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे. ज्येष्ठ महिला महापालिकेतून सफाई कामगार म्हणून निवृत्त झाल्या आहेत. महिलेने नातीच्या उपचारासाठी सावकाराकडून कर्ज घेतले होते; मात्र तिच्या अशिक्षितपणाचा अपलाभ घेऊन आरोपीने तिच्याकडून पैसे उकळले. प्रतिदिन भीक मागणार्‍या या महिलेकडे एका व्यक्तीने सहज चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

आरोपी महापालिकेत झाडू खात्यात नोकरीला आहे. गरजू नागरिकांना १० टक्के व्याजाने पैसे देऊन तो त्यांच्याकडून वसुली करत होता. त्याच्याकडे आणखी काही जणांची पासबूकेही सापडली आहेत. त्यामुळे आणखी कुणाकडून त्याने पैसे घेतले असल्यास खडक पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरि भैरट यांनी केले आहे.