देहलीतील काँग्रेस मुख्यालयाचे १२ लाख ६९ सहस्र रुपयांचे भाडे थकित !

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाचेही भाडे थकित

सरकारचे लाखो रुपयांचे भाडे थकित ठेवणार्‍या पक्षावर अद्याप केंद्र सरकारने कारवाई का केली नाही ?, याचे उत्तर त्याने जनतेला दिले पाहिजे ! सामान्य व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रमाणात भाडे थकवता आले असते का ? प्रशासनाने कधीच अशा व्यक्तीला बाहेर काढले असते ! – संपादक

नवी देहली – सामाजिक कार्यकर्ते सुजित पटेल यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीमध्ये अकबर रोडवरील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाचे १२ लाख ६९ सहस्र ९०२ रुपयांचे भाडे थकित असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी हे भाडे डिसेंबर २०१२ मध्ये भरले होते. यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांच्या सरकारी निवासस्थानांचे भाडेही थकित असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने ही माहिती दिली.

१. सोनिया गांधी यांच्या ‘१० जनपथ रोड’ येथील निवासस्थानाचे थकित भाडे किमान ७० सहस्र रुपयांहून अधिक आहे. त्यापूर्वी ते सप्टेंबर २०२० मध्ये भरण्यात आले आहे.

२. सोनिया गांधी यांच्या सचिवांच्या चाणक्यपुरीतील निवासस्थानाचे ५ लाख ७ सहस्र ९११ रुपये भाडेही थकित आहे. याचे भाडे ऑगस्ट २०१३ मध्ये भरण्यात आले होते.

३. जून २०१० मध्ये ‘ए रोज अव्हेन्यू’ ही जागा पक्षाचे कार्यालय बांधण्यासाठी काँग्रेसला देण्यात आली. काँग्रेसने अकबर रोडवरील कार्यालय वर्ष २०१३ मध्येच रिकामे करायला हवे होते; मात्र पक्षाने त्यानंतर सातत्याने मुदतवाढ मागितली आहे.

सोनिया गांधी यांच्या नावे साहाय्यता निधी जमा करणार ! – भाजप

‘निवडणूक न जिंकल्याने सोनिया गांधी यांना घोटाळे करता येत नाहीत. त्यामुळे त्या या निवासस्थानांचे भाडे भरू शकत नाहीत,’ असा आरोप भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी केला. त्यांनी ‘सोनिया गांधी रिलिफ फंड’ (सोनिया गांधी साहाय्यता निधी) नावाचा ‘ट्रेंड’ चालू करून त्यांच्या खात्यात १० रुपये भरल्याचेही यात म्हटले आहे.