भविष्यात भगवा ध्वज ‘राष्ट्रध्वज’ बनू शकतो; मात्र सध्या तिरंग्याचा आदर करायला हवा ! – कर्नाटकमधील मंत्री ईश्‍वरप्पा

उजवीकडे मंत्री ईश्‍वरप्पा

शिवमोग्गा (कर्नाटक) – भविष्यात भगवा ध्वज हा ‘राष्ट्रध्वज’ बनू शकतो; मात्र सध्या तिरंगा हा आता राष्ट्रध्वज असून त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे ग्रामीण विकास अन् पंचायत राज मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी केले. शिवमोग्गा येथे हिजाबच्या प्रकरणी आंदोलन करतांना एका महाविद्यालयात एक मुलगा राष्ट्रध्वज फडकावतात त्या खांबावर चढून तेथे भगवा ध्वज फडकावत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यावर ईश्‍वरप्पा बोलत होते.

१. ईश्‍वरप्पा पुढे म्हणाले की, शेकडो वर्षांपूर्वी प्रभु श्रीरामचंद्र आणि मारुति यांच्या रथांवर भगवे झेंडे होते. तेव्हा आपल्या देशात तिरंगा ध्वज होता का ? आता तो (तिरंगा) आपला राष्ट्रध्वज म्हणून निश्‍चित झाला असून त्याचा मान राखला गेला पाहिजे, यात प्रश्‍नच नाही.

२. ‘लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवता येईल का ?’, असा प्रश्‍न एका पत्रकाराने विचारल्यावर ईश्‍वरप्पा म्हणाले की, आज नाही, तर भविष्यात कधीतरी. आज देशात ‘हिंदु विचार’ आणि ‘हिंदुत्वा’ची चर्चा होत आहे. ‘अयोध्येत राममंदिर बांधणार’, असे आम्ही म्हणत होतो, तेव्हा लोक हसायचे. आता आपण ते बांधत आहोत ना ? त्याचप्रमाणे भविष्यात कधीतरी १००, २०० किंवा ५०० वर्षांनी भगवा ध्वज राष्ट्रध्वज होईल. तिरंग्याला आता घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली आहे, त्याचा आदर केला पाहिजे आणि जो त्याचा आदर करणार नाही, ते देशद्रोही ठरतील.

३. शिवमोग्गा येथील शासकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज काढून भगवा ध्वज फडकवला, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी केला होता. त्यावर  ईश्‍वरप्पा म्हणाले की, शिवकुमार यांचा दावा खोटा आहे. ते खोटारडे आहेत. तेथे भगवा ध्वज फडकावला गेला; पण राष्ट्रध्वज खाली उतरवला गेला नाही. भगवा ध्वज कुठेही फडकवता येईल; पण राष्ट्रध्वज खाली करून तसे झाले नाही आणि कधीच होणारही नाही.