कर्नाटकातील हिजाबच्या प्रकरणावर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी देहली – कर्नाटकातील हिजाब प्रकरणाशी संबंधित याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची विनंती करणार्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ‘हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे. या टप्प्यावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप का करावा ?’ असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. काँग्रेसचे नेते अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. सिब्बल यांच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘कदाचित् कर्नाटक उच्च न्यायालयच तुम्हाला दिलासा देऊ शकेल. आधी तेथे सुनावणी होऊ द्या.’ या याचिकेवर पुढील सुनावणीसाठी कोणताही दिनांक देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
The Supreme Court said it was “too early” for it to intervene in the #Karnataka hijab row when the State High Court was hearing it, reports @kdrajagopal https://t.co/sD89puuk4o
— The Hindu (@the_hindu) February 10, 2022
कपिल सिब्बल युक्तीवाद करतांना म्हणाले, ‘‘२ मासांनी परीक्षा आहेत आणि मुलींना शाळेत येण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्यावर दगडफेक केली जात आहे. हे त्या धार्मिक प्रकरणासारखे आहे, ज्यावर ९ न्यायाधिशांच्या खंडपिठाने सुनावणी केली होती.’’ केरळच्या शबरीमला मंदिरात १० ते ५५ वयोगटांतील महिलांना प्रवेशबंदी असल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधिशांच्या खंडपिठाने सुनावणी केली होती. त्याचा संदर्भ सिब्बल यांनी दिला. सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात ३ न्यायाधिशांचे खंडपीठ हिजाब प्रकरणाची सुनावणी करत आहे.