पंडित नथुराम गोडसे यांच्यावर आधारित ‘व्हाय आय किल्ड गांधी ?’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात नथुराम गोडसे यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी साकारली आहे. अमोल कोल्हे यांनी यापूर्वीही दूरचित्रवाहिनीवरील ‘संभाजीराजे’ या मालिकेत छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका साकारली होती. चित्रपट अथवा मालिका यांत एखादी ऐतिहासिक भूमिका करण्याचे ठरवतांना किंवा ती भूमिका पार पाडतांना कलाकाराला त्या भूमिकेचा अभ्यास करणे, त्या व्यक्तीरेखेशी एकरूप होणे, तिची विचारप्रक्रिया समजून घेणे आदी सर्व करावे लागते. हे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे ‘व्हाय आय किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेसकडून होणारा विरोध लक्षात आल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘ही भूमिका स्वीकारणे किंवा करणे ही माझी चूक आहे’, असे सामाजिक माध्यमांद्वारे घोषित केले.
आपण एका पक्षाचे खासदार आणि कलाकार आहोत. दोन्ही व्यक्तीरेखा सांभाळायच्या असतील, तर अशा प्रकारे भूमिका स्वीकारणे म्हणजे रंगबदलू सरड्याप्रमाणेच आहे. जर तुम्ही नथुराम गोडसे यांची भूमिका स्वीकारली आहे, तर त्या भूमिकेचा अभ्यास करणे अपेक्षित होते. ती भूमिका पटणारी नव्हती, याचेही भान असायला हवे होते. ‘पैशांसाठी आणि माझ्याकडे काम नसल्याने मी ती भूमिका स्वीकारली’, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. चित्रपटांतील संवाद आणि त्यातील पार्श्वभूमी दाखवण्यासाठी गांधी यांच्या हत्येच्या खटल्यांमध्ये न्यायालयामध्ये उपलब्ध असलेल्या लेखी पुराव्यांचा आधार घेतला आहे. ते पुरावे न्यायालयानेही सत्य मानले आहेत. गांधींची हत्या करण्यामागील कारणे, ती कोणत्या परिस्थितीत केली ? त्या मागील गोडसे यांची भूमिका यांविषयी सर्वकाही स्पष्टपणे वाचण्यासाठी न्यायालयीन निकाल उपलब्ध आहे. त्यावरूनच जर चित्रपट निर्माण केला असेल, तर काँग्रेसी आणि त्यांचे लांगूलचालन करणारे निधर्मी यांचा हा ढोंगीपणाचा म्हणावा लागेल.
‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे जनमानसांत स्वतःची प्रतिमा उंचावली आणि नथुराम गोडसे यांच्या भूमिकेमुळे प्रतिमा डागाळली गेली’, यावरून ‘मी ही भूमिका केली, ती माझी चूक आहे’, असे डॉ. कोल्हे मान्य करत असतील, तर अशा कलाकारांवर विश्वास कसा
ठेवायचा ? ‘राजकारण्यांप्रमाणे अभिनेतेही आता रंग पालटत आहेत आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशा भूमिका करत आहेत’, असे जनतेने म्हटल्यास चूक ते काय ?’
– श्री. महेंद्र सहस्रबुद्धे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.