परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळासाठी करायला सांगितलेली सिद्धता म्हणजे ईश्वराने त्यांच्या रूपात येऊन केलेली परम कृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘ईश्वराच्या ईश्वरत्वाचा आणि अन्य सर्वच दैवी गुणांचा उगम त्याच्या ‘निरपेक्ष प्रीती’ या गुणातून होत असतो. त्या ब्रह्मांडनायकाचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अलौकिक प्रेम हेच आम्हा साधकजिवांचे इहलोकीचे आणि परलोकीचे वैभव आहे. तेच या सृष्टीचे, म्हणजे आपल्या जन्माचे कारण आणि आनंदप्राप्तीचे कार्यही तेच आहे. तेच भगवंताने पृथ्वीवर दहा अवतार घेण्याचे कारण असून भक्तांवरील प्रीतीमुळेच ईश्वर धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. ईश्वराची प्रीती हीच धारणाशक्ती असून तोच धर्म आहे. ईश्वराच्या ‘प्रीती’ या अनन्यसाधारण गुणांमुळेच सर्व जिवांना त्याची ओढ लागते. त्याच्या प्रीतीविना सूर्य, चंद्र आणि तारांगणे एका क्षणात निष्प्रभ होतील अन् आपले सर्वांचे जीवन कवडीमोल होईल.

८ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आपण ‘आपत्काळ येणारच आहे’, असे द्रष्टे पुरुष आणि संत यांनी भाकीत केलेले असणे, अन् ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी आपत्काळाची सर्व स्तरांवर सिद्धता करायला सांगणे’ ही सूत्रे पाहिली. आज आपण या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/550877.html

३. ‘आपत्काळात तरून जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर काय सिद्धता करायला हवी’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन 

३ अ. शारीरिक स्तरावरील सिद्धता : अन्नधान्य, कपडे, औषधे, निवास यांची, तसेच अन्य गोष्टींची सिद्धता करून ठेवण्यास सांगितली आहे.

३ आ. मानसिक स्तरावरील सिद्धता : युद्ध मानसिक बळावरच जिंकता येते. त्यामुळे आपत्काळासाठी मनाची सिद्धता होणे, अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या मनाचे निरीक्षण आणि अभ्यास करून ‘मनात कोणत्या चिंता किंवा प्रश्न आहेत ? मन कशात अडकले आहे ?’, हे शोधून त्यावर स्वयंसूचना घेणे अन् प्रसंगांचा सराव करणे, या गोष्टींद्वारे ‘आपले मनोबल कसे वाढवायचे ?’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतंत्र ग्रंथ संकलित केला आहे. स्वयंसूचना घेतल्याने मनातील भीती, ताण, निराशा, चिंता दूर होऊन मन परिस्थितीचा स्वीकार करील आणि त्यामुळे साधना भावपूर्ण अन् तळमळीने होईल अन् आध्यात्मिक बळ वाढेल.

३ इ. आध्यात्मिक स्तरावरील सिद्धता : आध्यात्मिक बळ हेच खरे बळ आहे. आत्मबळ असेल, तर मन आनंदी आणि स्थिर रहाते अन् योग्य निर्णय घेते.

३ इ १. नामजपादी उपायांनी संरक्षककवच निर्माण होऊन सकारात्मकता वाढणे : प्रतिदिन देवीकवच, रामरक्षा, शिवकवच यांसारखी स्तोत्रे म्हणणे, नामजप निष्ठेने आणि भावपूर्ण करणे, यांमुळे आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होते आणि आपली सकारात्मकता वाढते.

३ इ २. आपत्कालीन सत्संग शृंखला चालू करणे आणि कलियुगातील हे सत्संग, म्हणजे श्रीमन्नारायणाचे अवतारी कार्य असणे : साधकांची मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे आपत्कालीन सत्संग शृंखला चालू झाली. कलियुगातील हे सत्संग, म्हणजे श्रीमन्नारायणाचे अवतारी कार्य आहे. माता सरस्वतीच्या (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या) दिव्य वाणीतून श्रवणारे दिव्यामृत प्राशन केल्यामुळे साधकांमध्ये भावावस्था आणि ईश्वराप्रती दृढ निष्ठा यांचे रोपण अन् संवर्धन प्रत्यक्ष गुरुदेवच करत आहेत.

३ इ ३. ‘गुरुचरणी अढळ निष्ठा, अंतःप्रेरणा, आज्ञापालन, ईश्वरचरणी सर्वस्वाचा त्याग’ हे दैवी गुण परात्पर गुरु डॉक्टर साधकांमध्ये बिंबवत असून साधकांना आपत्काळासाठी मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा पुरवत असणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘आपत्काळाविषयीचे मनातील सर्व विचार गुरुचरणी अर्पण करूया’, असे भावसत्संगात सांगून साधकांना गुरुचरणी आत्मनिवेदन करायला लावल्यामुळे साधकांच्या मनातील ताण-तणाव, विचार, चिंता, भविष्याची भीती, यांमुळे साधकांची साधना आणि वर्तमान स्थिती बिघडू न देण्याचे अलौकिक गुरुकार्य अन् धर्मकार्य त्या करत आहेत. त्या ‘साधना, गुरुचरणी अढळ निष्ठा, अंतःप्रेरणा, आज्ञापालन आणि ईश्वरचरणी सर्वस्वाचा त्याग’, हे दैवी गुण साधकांमध्ये बिंबवून त्यांना आपत्काळासाठी मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा पुरवत आहेत. या सत्संगांमुळे साधकांचे मन मोकळे होऊन त्यांच्या मनाची सकारात्मकता वाढत आहे. सत्संगात सांगितल्या जाणार्‍या निष्ठावंत भक्तांच्या कथा इतक्या सुंदर असतात की, तिचा परिणाम आठवडाभर टिकून रहातो.

सौ. शालिनी मराठे

४. ‘या आपत्काळात साधकांचे रक्षण होणे’, ही गुरुकृपाच असेल’, असे महर्षींनी म्हणण्याचे कारण आणि त्यामागील विचारप्रक्रिया

४ अ. आज्ञापालन हेच शिष्यत्व आणि आज्ञापालन हीच शिष्याची गुणवत्ता ! : ‘गुरुकृपायोगात सर्वकाही श्री गुरूंचे आहे’, या भावाने शिष्य आपले सर्वस्व गुरूंना अर्पण करतो. तो गुरूंच्या आज्ञेचे पालन करत त्यांची सेवा करतो. तो शरणागत आणि निष्ठावंत सेवक असतो. आज्ञापालन हेच शिष्यत्व अन् आज्ञापालन हीच शिष्याची गुणवत्ता. आज्ञापालन करतांना शिष्याचे मन, बुद्धी आणि अहं यांचा लय होतो. त्यामुळे विश्वमन आणि विश्वबुद्धी यांतून देव जे सांगतो, ते त्याला आकलन होते. ईश्वरेच्छेने वागल्यामुळे त्याच्यावर ईश्वराची, म्हणजे श्री गुरूंची कृपा होते आणि शिष्याचे रक्षण होते.

४ आ. साधनेने आध्यात्मिक बळ मिळून मन सकारात्मक आणि आनंदी होणे : साधनेने आध्यात्मिक बळ वाढते. त्यामुळे मन सकारात्मक, आनंदी आणि स्थिर रहाते. मन स्थिर अन् सकारात्मक असेल, तर शरीर योग्य प्रतिसाद देते. साधनेने प्रतिकूल परिस्थिती स्वीकारणे, कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहाणे, साधकाच्या आवश्यकता न्यूनतम होणे, या गोष्टी सहज साध्य होतात. साधकाचे मन सकारात्मक असल्यास साधकाला ‘प्रतिकूल काळ कधी संपतो’, याचे भानही रहात नाही. अशा प्रकारे तो आपत्काळात तग धरून राहू शकतो. लोकरीचे कपडे घातलेल्या व्यक्तीला थंडीची बाधा होत नाही, त्याप्रमाणे साधना करणार्‍याला प्रतिकूल काळ (संकटे) बाधत नाही; म्हणूनच ‘या आपत्काळात साधकांचे रक्षण होणे, ही गुरुकृपाच असेल’, असे महर्षींनी म्हटले आहे. ‘आपल्यावरही गुरुकृपा व्हावी आणि आपले रक्षण व्हावे’, असे ज्यांना वाटते, त्यांनी लगेच परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे साधनेस आरंभ करायला हवा.

४ इ. कोरोना महामारीच्या काळात गुरुदेवांनी साधकांना फुलाप्रमाणे जपले, तरीही आपल्याला चिंता वाटत असल्यास तळमळीने साधना वाढवणे आवश्यक असणे : आपले आई-वडील किंवा आपण स्वतःही आपली जेवढी काळजी घेऊ शकणार नाही, तेवढी गुरुदेवांनी आपली काळजी घेतली. स्वयंपाकघरातील पोळ्यांचे यंत्र बंद पडल्यावर साधकांनी डोसे, पराठे, सूप इत्यादी पदार्थ बनवले. वैद्यांनी वाफेचे भांडे, होमिओपॅथीच्या रोगप्रतिबंधक गोळ्या, दिवसातून दोन वेळा गरम आयुर्वेदिक काढा पुरवला, तर संतांनी नामजपादी उपाय, स्तोत्र पठण, अभिमंत्रित जल इत्यादी देऊन आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर सर्वतोपरी काळजी घेतली अन् साधनाही करवून घेतली. त्यामुळेच आपण रोगमुक्त आणि आनंदी राहू शकलो. आतापर्यंत गुरुदेवांनी आपल्याला प्रत्येक संकटात तारले आहे, आपली काळजी घेतली आहे, तर यापुढे ते काळजी घेणार नाहीत का ? इतके असूनही आपल्याला चिंता वाटते, म्हणजे आपली निष्ठा अल्प पडते, आपली साधना अल्प पडते आणि आपला अहं आपल्याला त्रास देतो. आपला भाव अल्प पडतो. त्यासाठी तळमळीने साधना करणे, हाच पर्याय आहे.

४ ई. ‘देह जावो अथवा राहो; पण तुमच्या चरणी निष्ठा, भाव दृढ होवो’, अशी श्री गुरुचरणी शरणागतभावाने प्रार्थना करूया ! : आपण साधना करणारे कोण ! गुरुदेवांच्या कृपेनेच सर्वकाही होते. ‘मी निष्ठा ठेवीन, मी साधना करीन’, हाही अहं आहे. आपण श्री गुरूंना संपूर्ण शरण जाऊया आणि त्यांच्या चरणसेवेची संधी मिळण्यासाठी अन् निष्ठा, भाव-भक्ती दृढ करण्यासाठी याचना करूया आणि आपत्काळातील त्या सच्चिदानंद परब्रह्माची लीला अनुभवूया. येणार्‍या आपत्काळातही परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रीतीमुळेच साधकांचे रक्षण होणार आहे. आपण तळमळीने साधना करूया.

प.पू. गुरुदेवांच्या चरणी संपूर्ण निष्ठा ठेवून समर्पितभावाने त्यांचे आज्ञापालन करूया आणि त्यांची कृपा अनुभवूया. त्या आनंदस्वरूप गुरुदेवांना साधना आणि आज्ञापालन करून आनंद देऊया अन् त्यांच्याच कृपेने या आपत्काळात तरून जाऊया.

परात्पर गुरु डॉक्टर, हे कृतज्ञतापुष्प तुमचेच आहे. ते तुम्हाला अर्पण करते.’                                                (समाप्त)

– गुरुचरणी शरणागत, सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.३.२०२१)