स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे मुंबईत निधन

२ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घाेषित !

मुंबई – संगीताच्या माध्यमातून तब्बल ८ दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या गानकाेकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे मुंबईत ‘ब्रीच कॅंडी’ रुग्णालयात सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झाले. भारतरत्न लतादीदी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शाेककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घाेषित करण्यात आला आहे.

लतादीदींना ८ जानेवारी २०२२ या दिवशी काेराेनाची लागण झाली हाेती. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना  ‘ब्रीच कॅंडी’ रुग्णालयात भरती करण्यात आले हाेते. त्यातून त्या बर्‍याही झाल्या हाेत्या, मात्र त्यानंतर त्यांचे सर्व अवयव निकामी हाेत गेले आणि अंतत: आज सकाळी त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांनी मराठी, हिंदी इत्यादी २२ भाषांमध्ये ५० सहस्रांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष २००१ मध्ये त्यांना भारताचा सर्वाेच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले होते. लतादीदींना त्यांच्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला होता. त्यांना वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षापासून वडिलांकडून संगीताचे धडे मिळाले होते.

पंतप्रधान माेदी यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनानिमित्त शाेक व्यक्त केला आहे.

(लता मंगेशकर यांच्याविषयीचे संगीतक्षेत्रातील मान्यवरांचे विशेष लिखाण लवकरच प्रकाशित करत आहाेत.)