खोट्या गुन्ह्यात अडकवून जामिनासाठी ५० लाख रुपयांची मागणी करणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍यासह तिघांविरुद्ध गुन्हा !

कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची अशी सर्वसामान्यांची स्थिती झाली आहे ! कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – संपादक 

पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा

मुंबई – फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जामिनासाठी ५० लाख रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणी पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यासह तिघांविरुद्ध चेंबूर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे शर्मा यांना पोलीस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आले होते.

चेंबूर परिसरात रहाणार्‍या ३२ वर्षीय तरुणीने याविषयी तक्रार केली आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२० मध्ये भावाला फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून शर्मा यांनी त्याच्याकडून २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याला याच गुन्ह्यात अडकवण्यात आले. या गुन्ह्यात जामीन पाहिजे असल्यास ५० लाख रुपये द्यावे लागतील, असे निलंबित पोलीस अधिकारी अनिल जाधव आणि एक व्यक्ती राजू सोनटक्के यांच्या माध्यमातून सांगितले. पैसे दिले नाही, तर १५ कोटी किमतीची मालमत्ता नावावर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यावर चौकशीअंती ३ फेब्रुवारीला रात्री चेंबूर पोलीस ठाण्यात शर्मा यांच्यासह तिघांच्या विरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.