उत्तरप्रदेशातील निवडणूक आणि हिंदुत्व !

संपादकीय

हिंदुत्वनिष्ठ राजकारण्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे प्रखर हिंदुत्व जोपासावे !

देशात पंजाब, उत्तरप्रदेश, गोवा, मणीपूर आणि उत्तराखंड या ५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोमाने चालू आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान १० फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. भविष्यातील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या सर्व राज्यांतील निवडणुकांना विशेष महत्त्व असले, तरी उत्तरप्रदेशातील निवडणूक हा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. ‘देशातील सर्वाधिक विधानसभेच्या ४०३ जागा असलेले आणि लोकसभेत सर्वाधिक ८० खासदार पाठवणारे राज्य’ म्हणून उत्तरप्रदेशची निवडणूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरते. केवळ सर्वांत मोठ्या मतदारसंघामुळे उत्तरप्रदेशची निवडणूक हा चर्चेचा विषय नाही, तर तेथील विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वांचे केंद्रबिंदू आहेत. अयोध्या येथे रामजन्मभूमीवर श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचे कार्य चालू आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. थोडक्यात उत्तरप्रदेशमधील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशमध्ये प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असली, तरी हिंदुत्वाच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

भाजपसाठी राजमार्ग

मागील काही वर्षांत बहुजन समाजवादी पक्षाच्या मायावती, त्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि आता भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशची सत्ता सांभाळली आहे. सद्यःस्थितीत उत्तरप्रदेशमधील काँग्रेसची राजकीय शक्ती नगण्य आहे. बसपच्या मायावती याही या निवडणुकीत तेवढ्या प्रमाणात सक्रीय नाहीत. त्यामुळे उत्तरप्रदेशमधील निवडणुकीतील लढत समाजवादी पक्ष आणि भाजप यांमध्येच होणार आहे. यामध्येही भाजपचे पारडे जड आहे. वर्ष २०१७ च्या निवडणुकीत उत्तरप्रदेशमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आला होता. या वेळीही भाजप बहुमताचा आकडा पार करील, असे अनुमान राजकीय विश्लेषकांनी वर्तवले आहे. मागील निवडणुकीच्या वेळी मोदी लाटेत उत्तरप्रदेशमध्ये भाजपला भरघोस पाठिंबा मिळाला. सद्यःस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानुसार होत असलेल्या राममंदिराच्या उभारणीमुळे तेथील हिंदूंमध्ये एक विश्वासार्हता निर्माण झाली आहे. त्याचा राजकीय लाभ भाजपला निश्चितच होणार आहे. मागील ५ वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी चालवलेल्या शासनावरून भाजपच्या पारड्यात ही मते पडणार आहेत. मागील निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नावाने झाली असली, तर आताच्या निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नावाचेही वलय उत्तरप्रदेशमध्ये आहे. भाजपसाठी ही आश्वासक स्थिती आहे. या वेळीही भाजप उत्तरप्रदेशमध्ये बहुमताने सत्तेत आला, तर भविष्यातील लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासाठी, पर्यायाने भाजपसाठी हा राजमार्ग ठरेल.

हिंदुत्वाची विचारसरणी स्पष्ट असणारे योगी

सध्या अनेक जण सोयीनुसार हिंदुत्वाचा वापर करतात. स्वत:ला ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हणवून घेणारे अनेक नेते मतांचा प्रश्न येतो, तेव्हा सोयीनुसार ‘सर्वधर्मसमभाव’, ‘धर्मनिरपेक्षता’ यांचा वापर करतात; मात्र ‘हिंदुत्व’ हेच सर्वसमावेशक कल्याणकारी आहे’, ही योगी यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा वैचारिक भाग ते माध्यमांपुढेही ठामपणे मांडतात. हिंदुत्व अंगीकारल्यामुळे अनेकदा काही तथाकथित पत्रकार त्यांना संकुचित आणि धर्मांध ठरवण्याचा प्रयत्न करतात; मात्र हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट असल्यामुळे ते तितक्याच प्रगल्भतेने अन् संयमाने वैचारिक प्रतिवाद करून समोरच्यांना निरुत्तर करतात. अनेक नेते अल्पसंख्यांकांची मते जातील किंवा संकुचिततेचा शिक्का बसेल, यासाठी धर्मांधांच्या विरोधात भूमिका घ्यायला कचरतात. यावरून एका मुलाखतीमध्ये हिणवणार्‍या पत्रकाराला योगी यांनी ‘मुसलमान राष्ट्रविरोधी भूमिका घेत असतील, तर त्यांची गय केली जाणार नाही’, अशी ठामपणे आणि निर्भिडपणे भूमिका मांडली. राजकीय हितासाठी हिंदुत्वनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा बाजूला ठेवणार्‍यांपैकी योगी नाहीत, हे याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या नेत्यांनी योगी यांचा हा आदर्श घ्यायला हवा.

योगी आदित्यनाथ

हिंदुत्वाची विजयपताका

सद्यःस्थितीत भाजप हा देशातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असला, तरी भाजपचे कणखर नेतृत्व म्हणून पहायचे झाले, तर काही निवडकच नेतृत्व डोळ्यांपुढे येते. त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचे नाव येते. त्यामुळे ‘उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा योगी येऊ नयेत’, यासाठी हिंदुविरोधी शक्तींचा आटापिटा चालू आहे. ज्याप्रमाणे हिंदुविरोधी शक्तींसाठी योगी यांचा पराभव महत्त्वाचा आहे, तसाच हिंदुत्वनिष्ठांसाठी योगी यांचा विजय महत्त्वाचा आहे ! गोहत्या प्रतिबंधक कायदा, लव्ह जिहादविरोधी कायदा आदी कायदे योगी यांनी त्यांच्या कार्यकाळात केले. ‘भारतात लव्ह जिहाद अस्तित्वात आहे’, असे म्हणायलाही जेथे व्यवस्था कचरत होती, त्या वेळी योगी यांनी त्या विरोधात केवळ आवाजच उठवला नाही, तर कायदा आणून त्याला राज्यात रोखण्याचाही प्रयत्न केला. सध्या हिंदूंना ज्या समस्या भेडसावत आहेत, त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना काढण्याचा प्रयत्न योगी यांच्या कार्यकाळात झाला, हे विशेष म्हणावे लागेल. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ शासनकर्ता सत्तेत आल्यावर काय होऊ शकते, याची चुणूक हिंदूंना पहायला मिळाली.

हिंदु समाज सूज्ञ आहे. त्यामुळे कुणाला निवडून आणायचे आणि कुणाला घरी बसवायचे, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. ‘घोडामैदान’ आता फार दूर नाही. निवडणुकीच्या निकालातून जनकौल आपल्याला दिसून येईल. उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या निकालाचे दूरगामी परिणाम होतील एवढे मात्र निश्चित !