व्यसनाधीन तरुणाई !

फर्ग्युसन महाविद्यालय

शैक्षणिक वारसा लाभलेल्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात एका मासात ८०० हून अधिक दारूच्या बाटल्या सापडल्या, अशी माहिती ‘पुणे प्लॉग्गर्स’ या संस्थेने दिली आहे. या घटनेतून तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. यामुळे ‘विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात कि व्यसनाधीन होण्यासाठी ?’, असा प्रश्न पडतो. विद्या मंदिरात दारू पिणारे विद्यार्थी देशाचे भवितव्य उज्ज्वल करणे तर दूरच; पण ते देशाला विनाशाच्या खाईतच लोटतील, हे निश्चित ! अशा घटना केवळ पुण्यातच नाही, तर राज्यासह देशात सर्वत्रच घडत आहेत. हे अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे.

किशोरवयीन मुले आणि तरुण यांच्यातील मद्यपानाचे वाढते प्रमाण ही भावी पिढीसाठी धोक्याची घंटा आहे. शहरात शिक्षणासाठी आलेल्या, तसेच वसतीगृहात रहाणार्‍या मुलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण अधिक आहे. आत्मविश्वासाचा अभाव, शैक्षणिक अपयश, कौटुंबिक ताणतणाव आणि प्रेमभंग या कारणांमुळे या वयोगटांतील मुलांना बर्‍याचदा नैराश्य येते. यातून बाहेर पडण्यासाठी ही मुले दारू पितात. चित्रपट, तसेच दूरचित्रवाणीवरील मालिका यांच्यात वारंवार दाखवले जाणारे दारू पिण्याचे प्रसंग अन् सद्यःस्थितीत दारूची सहजरित्या होणारी उपलब्धता या गोष्टी व्यसनाधीन होण्यास कारणीभूत ठरत आहेत. आज अल्पवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीही वाढत आहे. याचे मुख्य कारण व्यसनाधीनता हे आहे. अनेक गुन्हेगार अल्प वयाच्या मुलांना व्यसनासाठी पैसे देऊन त्यांच्याकडून मोठमोठे गुन्हे करवून घेतात. दारूच्या अतीसेवनामुळे शारीरिक हानीसह हत्या, आत्महत्या, कौटुंबिक हिंसा, महिलांवरील अत्याचार हे सामाजिक दुष्परिणाम होत आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात सापडलेल्या ८०० हून अधिक दारूच्या बाटल्या

जगातील इतर देशांच्या तुलनेत ‘आज भारतात युवकांची संख्या सर्वाधिक आहे’, हे आपण अभिमानाने सांगतो. त्याच्या बळावरच भारत विश्वगुरु होऊ शकतो; परंतु जर ही युवा शक्ती पाश्चिमात्यांप्रमाणे व्यसनाधीन झाली, तर भारत आज ज्या शिखरावर पोचण्याचा प्रयत्न करत आहे, तेथून त्याची घसरण होऊ शकते. आज आवश्यकता आहे, ती या युवा शक्तीला सुसंस्कारित करण्याची ! युवकांनो, देशावर परिणाम करणार्‍या या गंभीर स्थितीवर मात करण्यासाठी साधना करणे आणि धर्मशिक्षण घेणे यांविना पर्याय नाही, हे लक्षात घ्या !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे