गोव्यात आतापर्यंत रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ मिळून एकूण १० कोटी १३ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात !

निवडणुकीच्या वेळी नागरिकांना लाच म्हणून पैसे, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या जातात, हे लोकशाहीला लज्जास्पद ! – संपादक 

गोवा : राज्यात ८ जानेवारी या दिवशी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू असे मिळून एकूण १० कोटी १३ लक्ष रुपये किमतीचे साहित्य अंमलबजावणी पथकाने कह्यात घेतले आहे. यामध्ये ६ कोटी ३० लक्ष रुपये रोख रक्कम, २ कोटी ४४ लक्ष रुपये किमतीचे मद्य, १ कोटी ६ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ, २ लक्ष रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू आणि ३० लक्ष रुपये किमतीच्या भेटवस्तू यांचा समावेश आहे.

आचारसंहितेचे पालन होत आहे ना ? हे पहाण्यासाठी राज्यभर ८१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाकडे आतापर्यंत एकूण ३९८ तक्रारी आल्या आहेत, तर यामधील २५३ तक्रारी योग्य होत्या. आचारसंहितेचा भंग झाल्याच्या प्रकरणी आतापर्यंत एकूण ३८ ‘प्रथम दर्शनी अहवाल’ (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली आहे.