नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) – हिंदु धर्मात दोन सिद्धांत सांगितले आहेत. पहिला कर्मफलसिद्धांत आणि दुसरा पुनर्जन्मसिद्धांत ! प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ व्यक्तीला भोगावे लागते, असे कर्मफलसिद्धांत सांगतो. एखाद्या गुंडाने व्यक्तीचा पाय तोडणे आणि एखाद्या डॉक्टरांनी शस्त्रकर्म करण्यासाठी व्यक्तीचा पाय कापणे, यात गुंडाचा उद्देश व्यक्तीला इजा पोचवण्याचा असतो, तर डॉक्टरांचा उद्देश व्यक्तीला आजारातून बरे करण्याचा असतो. अशा प्रकारे कर्माचे फळ हे त्याच्या उद्देशावरही अवलंबून असते. व्यक्तीची सुखप्राप्तीसाठी धडपड असतांनाही व्यक्तीच्या वाट्याला दुःख का येते ? याची उकल विज्ञान करू शकत नाही, तर याचे उत्तर अध्यात्मात मिळते. व्यक्तीने जर साधना केली, तर त्याला कर्मातील योग्य-अयोग्य भेद कळून त्याच्या हातून योग्य कर्मच घडते. त्यामुळे कलियुगात साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयातील शिक्षकांसाठी ‘कर्मफलन्याय’ या विषयावर २७ जानेवारी या दिवशी मार्गदर्शन आयोजित केले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या प्रसंगी आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे या उपस्थित होत्या आणि त्यांनीही उपस्थितांचे शंकानिरसन केले.
विशेष
१. हे मार्गदर्शन केवळ १ घंट्यासाठी होते; मात्र जिज्ञासू शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नोत्तरांमुळे कधी २ घंटे संपले, ते कळले नाही आणि प्रत्येकाला मार्गदर्शन हवेहवेसे वाटत होते.
२. ‘मार्गदर्शन ऐकून हलके वाटले, इतर विचार मनात आले नाहीत’, अशा प्रकारची स्थिती अनुभवल्याचे उपस्थित शिक्षकांनी सांगितले.
३. याचसमवेत प्रत्येक आठवड्याला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकण्याची इच्छा सर्वांनी दर्शवली.