भारतीय रिझर्व्ह बँकेने १० रुपयांच्या नाण्याच्या वैधतेविषयी स्पष्ट करावे !

हरियाणाचे मुख्यमंत्री आणि विविध ठिकाणच्या जिल्हाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

अशी मागणी का करावी लागते ? रिझर्व्ह बँकेच्या हे लक्षात येत नाही का ?

फरिदाबाद (हरियाणा) – भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वर्ष २००९ पासून वर्ष २०१७ पर्यंत १४ वेळा १० रुपयांची नाणी चलनामध्ये आणण्यात आली आहेत. बँकेने याविषयी प्रसिद्धीपत्रक काढून त्याच्या वैधतेविषयी स्पष्ट केले आहे. असे असतांना समाजात पसरलेल्या चुकीच्या अफवेमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्यास नकार देतात आणि १० रुपयांची नोट देण्याची मागणी करतात. त्यामुळे ग्राहकांना साहित्य खरेदी करतांना अडचण येते. याविषयी बँकेने कार्यवाही करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ जानेवारी या दिवशी हरियाणाचे मुख्यमंत्री, तसेच हरियाणातील गुरुग्राम दक्षिण, गुरुग्राम पश्चिम, फरिदाबाद, शाहदरा; तसेच देहलीतील पश्चिम देहली, दक्षिण देहली, उत्तर पश्चिम देहली, पूर्वाेत्तर देहली, या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना ‘ई-मेल’च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये रिझर्व्ह बँकेने १० रुपयांचे नाणे स्वीकारण्याच्या संदर्भात त्वरित आदेश काढवा. ही नाणी घेण्यास नकार देणारे दुकानदार, विक्रेते यांच्यावर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट आदेशात उल्लेख असावा, याही मागण्या केल्या आहेत.